हॅलो कृषी ऑनलाईन : पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला आहे. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त उद्योजकांना प्रेरित करणे. तसेच या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते राज्याला सन्मानित करण्यात आले. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.
योजनेंतर्गंत राज्यात 793 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून, 53 कोटींची व्याज सवलत प्रदान करण्यात आलं आहे. केंद्र शासनानं पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष 2020 मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाकडे एकूण 916 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी पात्र 73 अर्जांमधून आतापर्यंत 26 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. या उद्योजकांना 793 कोटींचे कर्ज वाटप आणि 53 कोटींची व्याज सवलत देण्यात आल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्य शासनाला एकूण 15 हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्यावतीनं दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.