Grapes Export : युरोपात भारतीय द्राक्षांना मागणी वाढली; निर्यातीत 10 टक्के वाढ!

Grapes Export From India To Europe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : युरोपियन बाजारात भारतीय द्राक्षांच्या मागणीत (Grapes Export) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत 2023-24 मध्ये द्राक्ष निर्यातीत एकूण 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अशातच आता संपूर्ण मार्च महिना निर्यात सुरु राहणार असल्याने, द्राक्ष निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारतीय द्राक्ष कंटेनर वाहतूकमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती नाशिक येथील ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी एका नामांकित वृत्तपत्राच्या वृत्तामध्ये (Grapes Export) ही माहिती दिली आहे.

कंटेनर संख्येत 20 टक्क्यांनी वाढ (Grapes Export From India To Europe)

‘सह्याद्री फार्म्स’ ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली शेतकरी उत्पादक कंपनी असून, ती देशातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी आहे. तिचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी म्हटले आहे की, “द्राक्ष निर्यातीच्या कंटेनरच्या संख्येत यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. यावर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांनी आपले द्राक्ष बाग आधी धरलेले होते. ज्यामुळे द्राक्ष निर्यात (Grapes Export) देखील नेहमीपेक्षा तीन आठवडे आधीच सुरु झाली. मध्यंतरी युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्ष निर्यातीत खोडा पडला. ज्यामुळे निर्यात वाहतुकीसाठीच्या खर्चात वाढ झाली. मात्र सध्या युरोपातून भारतीय द्राक्षांना मागणी खूपच वाढली असून, आतापर्यंत द्राक्ष निर्यातीत 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.”

निर्यात दुप्पट होण्याची शक्यता

“याशिवाय शेतकऱ्यांना निर्यातवाढीमुळे सध्या चांगला दर मिळत आहे. भारतीय द्राक्ष निर्यातीचा हंगाम हा साधारणपणे जानेवारी ते मार्च या कालावधीत चालतो. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. मात्र तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम माल पिकवला आहे. अशातच सध्या युरोपियन देशांतून मागणी देखील वाढली आहे. ज्यामुळे यंदाच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत द्राक्ष निर्यात ही मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट होऊ शकते.” असेही त्यांनी म्हटले आहे.

नेदरलँड सर्वात मोठा खरेदीदार

युरोपियन देशांमध्ये नेदरलँड हा भारतीय द्राक्षांचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. एकटा नेदरलँड भारतीय द्राक्षांची 40 टक्के कंटेनर खरेदी करतो. याशिवाय अन्य द्राक्ष निर्यात ही प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, युनाइटेड किंग्डम, रशिया, बांगलादेश आणि अरब देशांमध्ये होते. मात्र यंदा युरोपियन देशांमध्ये भारतीय द्राक्षांना मागणी अधिक असलयाचे शिंदे यांनी म्हटले आहे.