हॅलो कृषी ऑनलाईन : कशी जोराचा पाऊस, कशी ढगाळ वातावरण तर कधी पावसाची उघडीप यामुळे कापूस पिकावर रसशोषक किडींचा (Sucking Pest On Cotton) प्रादुर्भाव झालेला आहे. याचे व्यवस्थापन कसे करायचे ? याची माहिती परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिली आहे जाणून घेऊया…
नियंत्रणाचे उपाय करताना कीड अचूक ओळखून, निरीक्षण करुन कीड व्यवस्थापनाचा निर्णय घ्यावा. त्यानंतर कीड व्यवस्थापन पद्धतीची निवड करुन प्रत्यक्ष (Sucking Pest On Cotton) अंमलबजावणी करावी. कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवता येते.
यांत्रिक पद्धतीनं नियंत्रण
- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेली कापसाचे गळालेली पाते आणि बोंडे जमा करून नष्ट करावीत.
- पिठ्या ढेकणाचे व्यवस्थापन करताना फक्त प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारणी करावी अथवा प्रादुर्भावग्रस्त भाग किडीसहित काढून नष्ट करावा.
- पिवळ्या रंगाला पांढऱ्या माशा आकर्षित होऊन चिकटतात. म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत.
- गुलाबी बोंड आळीग्रस्त डोमकळ्या दिसल्यास आतील अळीसहित त्या नष्ट कराव्यात.
- हेक्टरी चार ते पाच कामगंध सापळे लावावेत.
- कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी थांबे उभे करावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या टिपून खातील.
किड नियंत्रणाच्या मशागतीय पद्धती कोणत्या ?
- जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.
- शिफारशीनुसार दोन ओळीतील व दोन रोपांतील अंतर ठेवावे.
- मित्र कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके, (Sucking Pest On Cotton) मिश्र पिके घ्यावीत. कपाशी पिकाभोवती झेंडू आणि एरंडी या सापळा पिकांची एक ओळ कडेने लावावी.