हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , दुधामधील फॅटचे प्रमाण हे जनावरांच्या आहारावर अवलंबून असते. त्यामुळे जनावरांना चांगला आहार देणे गरजेचे असते. रोजच्या आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर कोरड्या चाऱ्याचाही समावेश केला पाहिजे. जनावरांना दिला जाणारा चारा निकृष्ट प्रतीचा असल्याने जनावरांच्या दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाणही कमी झालेले दिसून येते. सर्वसाधारणपणे पशुपालकांकडे असणाऱ्या गायी-म्हशीं जास्त दुधाचे उत्पादन देत असल्यास, त्यातील फॅटचे प्रमाण कमी असते.
१) धार काढण्याची वेळ
सकाळी सहा वाजता धार काढल्यास, सायंकाळी सहा वाजताच धार काढावी.
दोन धारेतील अंतर वाढविल्यास, दुधाचे प्रमाण वाढते मात्र, फॅटचे प्रमाण कमी होते. दिवसातून दोनदा धार काढत असल्यास, दोन धारेतील अंतर १२ तासांचे असावे. जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी असल्यास तीन वेळा धार काढावी. तीन धारेतील अंतर साधारणपणे आठ-आठ तासांचे असावे.
२) शेवटच्या धारेत फॅटचे प्रमाण अधिक
धार काढताना जनावरांची कास स्वच्छ धुऊन, कोरडी करून मगच धार काढावी. असे केल्याने कासेतील रक्ताभिसरण वाढून दुधातील फॅटचे प्रमाण वाढलेले दिसून येईल. कासेतील पूर्ण दूध सात मिनिटामध्ये काढून घ्यावे. काही वेळेस घाई-गडबडीत धार काढताना शेवटचे दूध पिण्यास वासराला सोडले जाते. दुधातील फॅटची घनता दुधापेक्षा कमी असल्याने, फॅट दुधावर तरंगत राहते. हे तरंगणारे फॅट शेवटच्या धारेद्वारे बाहेर येत असते. म्हणून शेवटच्या धारेतील दुधाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने, पूर्ण दूध काढून घेणे महत्त्वाचे आहे.
३)स्वछता आवश्यक
धार काढणाऱ्या व्यक्तीसोबतच जिथे धार काढली जाते, त्या जागेची स्वच्छताही महत्त्वाची असते. जनावरांना दगडीसारखे कासेचे आजार होणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. दुधाळ जनावरांच्या रोजच्या आहारात ३० ते ५० ग्रॅमपर्यंत क्षार-मिश्रणाचा समावेश करावा. २० लिटरच्या पुढे दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये क्षार-मिश्रणांचे प्रमाण वाढवीत न्यावे.
४) दुधाळ जनावरांच्या शरीरावर ताण आल्यानेसुद्धा दुधातील घटकांमध्ये बदल होत असतात. त्यामुळे दुधाळ जनावरांना बांधून ठेऊ नये. जेणेकरून त्यांचा चांगला व्यायाम होऊन, दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येईल.