हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो अनेकदा वीज कंपन्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्याचे काम करतात. मग अशावेळेला शेतातून वीज वाहिन्या न्याव्या लागतात किंवा मग शेतातही विजेचा टॉवर उभा केला जातो. तेव्हामात्र त्या ठिकाणच्या जमिनीत आपल्याला शेतीही करता येत नाही किंवा मग त्या जमिनीचा काही उपयोगही होत नाही. मात्र अशाप्रकारे शेतजमिनीवर टॉवर उभारल्यास किंवा जमिनीतून वीजवाहक तारा नेल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळू शकतो. नक्की काय आहे हा कायदा ? असे झाल्यास कुठे अर्ज करावा ? मोबदला किती मिळतो ? जाणून घेऊया…
कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र सरकारनं 1 नोव्हेंबर 2010 रोजी शासन निर्णय काढला. त्याअंतर्गत शेतजमिनीत 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारलं जात असेल, तर त्यासाठीच्या मोबदल्यासंदर्भात आदेश जारी केले.त्यानुसार, जमीन कोरडवाहू असेल, तर टॉवरसाठी जेवढी काही जमीन व्यापण्यात आली, तेवढ्या क्षेत्रफळासाठी त्या भागातील सरकारी बाजारभावाच्या (रेडी रेकनर) 25 % मोबदला निश्चित करण्यात आला. बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हा मोबदला रेडी रेकनरच्या 60% इतका निश्चित करण्यात आला.
शेतजमिनीत टॉवर उभारल्यास…
यानंतर सरकारनं 2017 साली एक नवीन शासन निर्णय पारित केला. त्यानुसार टॉवरखालची जमीन आणि विजेच्या तारेखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू केलं. ते आजतागायत लागू आहे.या धोरणानुसार, तुमच्या शेतात 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असेल, तर सुरुवातीला टॉवरनं व्यापलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर त्या क्षेत्रफळासाठी तुमच्या भागातील रेडीरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जाईल. मोबदल्याची ही रक्कम दोन समान टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदल्याची रक्कम ही टॉवरच्या पायाभरणीनंतर, तर दुसऱ्या टप्प्यातील मोबदला हा टॉवरचं काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल.
शेत जमिनीतून केवळ तारा जात असतील तर…
पण तुमच्या शेतात टॉवर उभारला गेला नसेल आणि फक्त लाईनच्या तारा जात असतील, तर तेव्हाही तुम्हाला मोबदला मिळू शकतो.यामध्ये टॉवर टू टॉवर जोडण्यासाठी वायरची जी लाईन जाते, तिला वायर कॉरिडॉर असं संबोधलं जातं. तर या कॉरिडॉरच्या खाली जेवढी जमीन येते, त्या जमिनीसाठी रेडीरेकनरदराच्या 15 % मोबदला दिला जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.ज्या जमिनीतून वीज वाहिनीच्या केवळ तारा गेलेल्या आहेत, यासाठीचा मोबदला प्रत्यक्षात वाहिनी उभारल्यानंतर दिला जातो.
कुठे कराल अर्ज ?
ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, त्या व्यक्तीला यासंबंधी आधी माहितीपर नोटीस दिली जाते. त्यानंतर मग 2017 सालच्या धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जातो. पण, काही कारणास्तव एखादी व्यक्ती नॉट रिचेबल (संपर्काबाहेर) असेल, तर ती महापारेषणच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते.
संदर्भ : बीबीसी मराठी