जाणून घ्या, हेल्दी लेट्युस लागवडीची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या आरोग्याबाबत लोक अधिक सतर्क झाल्याचे पाहायला मिळते आहे. दैनंदिन आहारात भारतीय अन्न आणि पालेभाज्यांसोबतच परदेशी भाज्यांचा देखील वापर भारतीय आहारामध्ये लोक करताना आढळतात. लेट्युस, ब्रॉकली, जुकीनी , चायनीज कोबी यासारख्य भाज्या देखील भारतीय बाजारात भाव खाऊ लागल्या आहेत. त्यांना मागणी देखील असते आणि चांगली किंमत देखील मिळते. आजच्या लेखात आपण लेट्युस या परदेशी भाजीच्या लागवडीबाबत जाणून घेणार आहोत.

लेट्यूस या भाजीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे तसेच लाेह, कॅल्शियम इ. पाेषक मूल्ये भरपूर प्रमाणात असतात. पाश्चिमात्य देशांत आहारात लेट्यूस ही भाजी सॅलड म्हणून वापरतात, तर आपल्याकडे भिजवूनदेखील भाजी वापरतात.

लेट्युसचे प्रकार
1)आईसबर्ग
2)बटरहेड
3)बिब टाईप /ग्रीन्स
4)कॉस /रोमेन
5)स्टेम लेट्यूस/सेलेट्यूस

सुधारित जाती : फुले पद्म
लागवड हंगाम : रब्बी (ऑक्टाेबर ते नाेव्हेंबर)
लागवड पद्धत : सपाट वाफा
लागवड अंतर : 30 सेंमी न् 20 सेंमी

फुले पद्म या जातीची वैशिष्टे

ही जात अधिक उत्पादन देणारी असून 298.74 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते. पाने आकर्षक हिरव्या रंगाची कुरकुरीत आहेत. या जातीमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत.

जमीन व हवामान

या पिकासाठी काेरडे व थंड हवामान मानवते. साधारणत: 7 ते 240 तापमानात या पिकाची वाढ उत्तम हाेते. मध्यम, उत्तम निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते. अतिहलकी, क्षारयुक्त, चाेपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. जमिनीचा सामू 5.5 ते 6.8 असावा.

पूर्वमशागत

जमिनीची एक खाेल नांगरट करून ढेकळे फाेडून पूर्वमशागत करून घ्यावी. कुळवाच्या आडव्या दाेन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत 10 टन प्रतिहेक्टरी सर्वत्र चांगले पसरून जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत.

राेपनिर्मिती

–उत्तम उगवणशक्ती असलेले 500 ग्रॅम बियाणे प्रतिहेक्टरी पुरेसे हाेते.
–भुसभुशीत केलेल्या जमिनीत एक बैलगाडी चांगले कुजलेले शेणखत प्रतिगुंठा मिसळून द्यावे.
–बियाणे पेरणीसाठी 3 न् 1 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. बियाणे पेरणीपूर्वी राेपांचे राेपवाटिकेत मर राेगापासून नियंत्रणासाठी गादीवाफ्यावर ट्रायकाेडर्मा व्हीरीडी 40 ग्रॅम प्रतिचाैरस मीटर वापरावे.
–पेरणी करताना ओळींमध्ये 10 सें.मी अंतर ठेवून 1 ते 1.5 सें.मी. खाेल बियाणांची पातळ पेरणी करावी.
–बियांची पेरणी ऑक्टाेबरचा पहिला पंधरवडा ते ऑक्टाेबरचा दुसरा पंधरवडा याकाळात करावी.
–बियाणे पेरणीनंतर बियांची उगवण हाेईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी आणि सायंकाळी झारीने पाणी द्यावे.
–त्यानंतर राेपांचे कीड व कीड राेगांपासून नियंत्रणासाठी 15 ते 20 दिवसांनी 10 मि.लि. फ्लुफाेझुराॅन अ 20 ग्रॅम मेटॅलॅक्झील एमझेड-72 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी.
–राेपे लागवडीसाठी 4 आठवड्यांत तयार हाेतात.

पुनर्लागण

पुनर्लागण करण्यासाठी निराेगी व एकसारखी वाढ झालेली जाेमदार राेपे घ्यावीत. राेपांची मुळे अ‍ॅझाेटाेबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जीवाणू (पीएसबी) प्रत्येकी 2.5 किलाेच्या द्रावणात बुडवून प्रतिहेक्टर लावावीत. राेपांची सपाट वाफ्यात दाेन ओळींमध्ये 30 सें.मी. आणि दाेन राेपांत 20 सें.मी. अंतर ठेवून नाेव्हेंबरचा पहिला पंधरवडा ते नाेव्हेंबरचा दुसरा पंधरवडा याकालावधीत लागवड करावी आणि लागलीच हलकेच पाणी द्यावे.

संदर्भ – बळीराजा मासिक