हेलो कृषी ऑनलाईन : उन्हाचा चटका वाढत असून ‘ऑक्टोबर हीट’ मुळे राज्यात तापमानात (Maharashtra Rain) वाढ होऊन उकाडा जाणवत आहे. राज्यात आज (दि. 5) उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र पुणे विभागाचे प्रमुख कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यातून दि. 6 ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज (Maharashtra Rain)
राज्यात आज (दि. 5) धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा (यलो अलर्ट) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस
हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत देशामध्ये व राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता, तो खरा ठरला असून देशात सरासरीच्या 108 टक्के तर राज्यात सरासरीच्या 126 टक्के पाऊस पडला, असे श्री. होसाळीकर यांनी सांगितले.