हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सरकारसोबतच उद्योग क्षेत्रातूनही खरीप हंगामातील मुगाच्या उत्पादनात (Moog Market Rate) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख उत्पादक प्रदेशांमध्ये विशेषतः राजस्थान आणि कर्नाटकमध्ये यंदा पावसाअभावी मूग पिकाला (Moog Market Rate) मोठा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात तर मान्सूनच्या पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे संपूर्ण देशभरातील मूग पीक प्रभावित झाले.
मात्र असे असले तरी सद्यस्थितीत बाजारात खरीप हंगामातील मुगाची काही प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात मुगाच्या मागणी आणि पुरवठ्यात संतुलन असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी सध्या मुगाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत नाहीये. मात्र सध्याच्या अन्य डाळवर्गीय (तूर, हरभरा) पिकांमधील तेजीचा परिणाम मुगाच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे येत्या काळात मुगाचे दर तेजीत राहण्याचे संकेत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रातील बाजारभाव (Moog Market Rate In India)
20 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मुगाला मिळालेला दर पुढीलप्रमाणे आहे. सोमवारी (ता.20) मुंबई बाजार समितीत मुगाला सर्वाधिक कमाल 12500 रुपये ते किमान 9000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जालना येथील बाजार समितीत कमाल 10700 ते किमान 7911 रुपये, सांगली येथील बाजार समितीत कमाल 10500 ते किमान 9000 रुपये, पुणे येथील बाजार समितीत कमाल 10300 ते किमान 9500 रुपये, अंमळनेर (जळगाव) बाजार समितीत कमाल 9911 ते किमान 8000 रुपये, गेवराई (बीड) बाजार समितीत कमाल 9880 ते किमान 8100 रुपये, मालेगाव बाजार समितीत कमाल 9526 ते किमान 4850 रुपये, चिखली (बुलढाणा) बाजार समितीत कमाल 9501 ते कमाल 7800 रुपये, अमरावती बाजार समितीत कमाल 9500 ते किमान 7000 रुपये, लातूर बाजारात कमाल 9180 ते किमान 7800 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळाला.
दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरही घाऊक बाजारात सध्यस्थितीत (20 नोव्हेंबर 2023) अनेक बाजार समित्यांमध्ये मुगाला 10600 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. जो 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 10494 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास नोंदवला गेला होता. तर किरकोळ बाजारात मूग डाळीला सध्या 116.64 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. जो 20 ऑक्टोबर 2023 रोजी 103.97 रुपये प्रति किलो नोंदवला गेला होता.
देशात मुगाचे उत्पादन प्रामुख्याने खरीप, रब्बीसह तीनही हंगामांमध्ये घेतले जाते. खरीप हंगामाला पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. तर सध्या सिंचनाची सोय असलेल्या भागातही रब्बीची पेरणी काहीशी मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात रब्बी आणि उन्हाळी मुगाच्या उत्पादनातही घट नोंदवली गेल्यास मुगाच्या दरात तेजीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे बाहेरील देशांमधून मुगाची आयात करण्याचे धोरण सरकारने गेल्या वर्षभरापासून पूर्णपणे थांबवले आहे. त्यामुळे या तेजीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.