कापसावरील बोगस औषधाची विक्री ; शेतकऱ्यांमुळे उघडकीस आले प्रकरण

cotton
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आधीच लहरी हवामानामुळे शेतकरी पुरता वैतागला असताना शेतकऱ्यांसमोर बोगस खते आणि कीटकनाशकांचे संकट उभे ठाकले आहे. एक तर शेतकरी कशीबशी जमवाजमव करून खते आणि कीटकनाशकांची खरेदी करतो त्यातही ती बोगस निघाली तर ? परभणी जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कापसावरील औषधांची बोगस विक्री करताना दोन जणांना पकडले. या प्रकरणी तब्बल 30 तासानंतर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्ब्ल ४ लाख ६५ हजारांची बोगस औषधे

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ही घटना परभणी जिल्ह्यातील मानवात येथे घडली आहे. मानवत परिसरामध्ये एका कारच्या माध्यमातून पेन्सी बायो या कंपनीचे बायो आर 303 हे बोगस फवारणी औषध विक्री केले जात असल्याची माहिती काही शेतकऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील बावळे, अर्जुन पंडित या दोन शेतकऱ्यांनी या कारचा पाठलाग करुन त्यांना पकडले. यामध्ये तब्बल 4 लाख 65 हजार 2376 रुपयांची बोगस औषधे असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले.

३० तासानंतर गुन्हा दाखल

यानंतर या शेतकऱ्यांनी सदर बोगस औषधांची गाडी मानवत पोलीस ठाण्यात आणली. या संदर्भामध्ये कृषी विभाग, गुण नियंत्रण पथक तसेच मूळ कंपनी प्रतिनिधीला कळवण्यात आले. त्यानंतर तब्बल 30 तासानंतर पेन्सी बायो या कंपनीचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सतीश तरोडकर आणि दत्ता शिंदे यांच्या विरोधात 420, 465, 34 भादवी 1860 तसेच कलम 51, 63, 64 कॉपी राईट अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करत आहेत. सध्या ही सर्व बोगस औषधे पोलिसांनी जप्त केली आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कृषी विभागाकडूनही करवाई केली जाणार आहे.