Satara News : सातारा जिल्ह्यातील ‘हे’ गाव ठरले राज्यातील पहिले फळांचे गाव, कसं काय ते पहा

Satara news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. फळांचे गाव म्हणून घोषित झाल्‍याबद्दल कृषि आयुक्त श्री.चव्हाण यांनी गावातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

धुमाळवाडी गावात शेतक-यांनी १९ विविध प्रकारची फळबाग लागवड केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पेरु, सिताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजिर, केळी, जांभुळ, ड्रॅगनफ्रुट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्रा, बोर नारळ, आंबा, पपई अशा विविध फळांचा समावेश सलग लागवडीमध्ये आहे. तसेच बांधावरती सफरचंद, स्टार फ्रुट, लिची, काजू, फणस, करवंद, खजुर या फळझाडांची लागवड केली आहे.

ही फळबाग लागवड रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत तसेच काही शेतक-यांनी स्वतःहून लागवड केली आहे. कृषि विभागाच्या विविध मेळावे, प्रशिक्षण, मार्गदर्शनाखाली फळबाग लागवड क्षेत्र वाढीसाठी मदत झाली तसेच शेतक-यांनी फळबाग लागवड करावी म्हणून विविध उपक्रम सुरु केले. या फळबागामुळे फळांचे उत्पादन त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योग, फळांची निर्यात यामध्ये गावाची प्रगती दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे.

कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांनी उत्पादित फळांचे गावातच प्रक्रिया करुन विक्री व्यवस्थापन करण्यासाठी तसेच फळप्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारण्यासाठी या गावातील शेतक-यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ देऊन नवउद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.