बीजप्रक्रिया भाग 1 : शेतकऱ्यांनो पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कराच ; जाणून घ्या फायदे

Seed processing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ आणि उत्पादकता संतुलित ठेवण्याचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले आहे, आणि म्हणुनच उत्पादन तसेच उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट बियाण्याचा वापर करणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट बियाण्याच्या निवडीनंतर त्यावर चांगल्या प्रकारची बीजप्रक्रिया करणे तितकेच महत्वाचे ठरते; कारण पेरणीनंतर अनेक प्रकारचे रोग मुलत: बिजापासून उदभवतात आणि पसरत असतात. तात्पर्य बियाण्याला बुरशी, कीटक तसेच असामान्य परिस्थिती पासून संरक्षण करण्यास बीजप्रक्रियेचा मोलाचा फायदा होतो.

बीज प्रक्रियेमुळे पिकास होणारे फायदे-

बीजप्रक्रियेमुळे सशक्त आणि गुणवत्तायुक्त रोपे तसेच कीड आणि रोग मुक्त रोपे मिळतात. परंतु आजमितीला असे अनेक शेतकरी आहेत की जे बीजप्रक्रिया न करताच पेरणी करतात आणि म्हणूनच बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याच्या वापरास वाव आहे, तसेच त्याचे फायद्यांचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्वाचे आहे.
१) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे बियाण्याद्वारे पसरणार्‍या रोगांचे नियंत्रण होते-
लहाण बिया (दाणे) असणारी पिके, भाजीपाला आणि कापूस इ. पिकावर बीजप्रक्रिया करणे महत्वाचे ठरते.
२) कीटकनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे बियाण्याचे किडींपासून संरक्षण होते-
बियाण्याची साठवणूक करण्यापूर्वी त्याला योग्य त्या किटक नाशकाची प्रक्रिया करूनच त्याची साठवणूक करावी, त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते.
३) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे जमिनीतून पसरणार्‍या रोगांचे नियंत्रण –
जमिनीतील बुरशी, जीवाणू आणि सूत्राकृमी सुत्रकृमिंपासून बीज आणि ऊगवण झालेल्या रोपांचे संरक्षण होण्यास मदत मिळते.
४) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे बियाण्याच्या उगवण क्षमतेत वाढ होते –
पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्याला योग्य त्या किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास कीड आणि बुरशीपासून संरक्षण होऊन उगवण क्षमतेत वाढ होते परिणामी पेरणीसाठी अधिक बियाणे वापरावे लागत नाही.

बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती-

१) मिठाच्या द्रावणाचा उपयोग- पाण्याचा वापर करुन मिठाचे २ टक्क्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. त्यासाठी २० ग्रॅम मीठ १ लीटर पाण्यात पुर्णपणे विरघळून घ्यावे. पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्याच्या प्रमाणानुसार मीठ आणि पाणी यांचे प्रमाण कमी अधिक करावे. शेतकरी मित्रांनो, या द्रवणात पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे पुर्णपणे बुडऊन ढवळून घ्यावे हलके आणि रोगयूक्त बियाणे पाण्यावरती तरंगु लागतात. ते बियाणे चाळणीने वेगळे करुन काढून टाकावेत, आणि तळाशी असलेल्या बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा.

२) बुरशीनाशकांचा उपयोग-पेरणीच्या बियाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी ते पावडर (भुकटी) स्वरुपात बाजारात उपलब्ध आहेत. प्रक्रियेसाठी बियाण्यावरती पातळ थर तयार होईल अशा पद्धतीने प्रक्रिया करवी.

बुरशीनाशकांच्या कार्यानुसार त्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते :

अ) यात पहिले रोगनाशक रसायन किंवा बुरशीनाशक याचा समावेश होतो : हे रसायन बीजप्रक्रियेनंतर रोगकारक बुरशीचा नाश करतात आणि बियाण्याचे बुरशी पासून रक्षण करतात. परंतु हे रसायन बीज जमिनीत पेरल्यानंतर अधिक काळापर्यंत सक्रिय राहत नाही.

ब) दुसरा प्रकार आहे रोगरक्षक रसायन किंवा बुरशीनाशक : या प्रकारातील रसायने बियाण्याच्या पृष्टभागाला चिकटून राहतात तसेच बीज उगवणींनंतर काही ठराविक काळापर्यंत पिकाचे रक्षण करतात.

शेतकरी मित्रांनो पुढच्या भागात बीजप्रक्रियेचे प्रकार आणि प्रक्रिया याबाबत माहिती घेऊया…