हेलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात तूर पीक (Tur Crop) हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. परंतु सध्याच्या वातावरणात मर रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर होत आहे. बहुतांश तूर पीक हे फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास 100 टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
तुरीवरील (Tur Crop) मर रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे
हा रोग जमिनीतल फ्युजॅरियम उडंम या बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश सें.ग्रे. व ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकास पाणी दिले तरी वर पानांपर्यंत पाण्याचे वहन होत नाही.
रोगाची लक्षणे
तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या शिरा पिवळ्या होतात. पाने पिवळी पडतात. झाडांची शेंडे मलूल होतात व कोमेजतात. झाड हिरवे असताना वाळते. वाळलेले झाडाची पाने गळत नाही. तसेच रोगाची तीव्रता पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त असते. प्रादुर्भावग्रस्त झाड मरते.
मर रोगाचे व्यवस्थापन
– कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा अंतर्भाव करावा. त्यामध्ये BDN-711, BDN-716, BSMR-736, Godavari.
– सलग तुरीचे पीक घेण्यापेक्षा ज्वारीचे पीक आंतरपीक घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच पिकाची फेरपालट करावी.
– पाणी साचणाऱ्या व पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत तुरीचे पीक घेऊ नये.
– ज्या शेतात पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात तूर पीक किमान तीन ते चार वर्षे घेऊ नये. या क्षेत्रात तुरीऐवजी तृणधान्य पिके घ्यावीत.
– शेतामध्ये मर प्रादुर्भावीत रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावीत. मर रोगग्रस्त शेतात 2 ते 3 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या 200 किलो शेणखतात मिसळून पिकात द्यावे किंवा आळवणी करावी.