हेलो कृषी ऑनलाईन : तूर (Tur Pest Management) हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कडधान्यवर्गीय पिक आहे. तुरीच्या डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये होतो. मागील काही वर्षांपासून तूर पिकाला चांगला बाजारभाव देखील मिळत आहे. काही भागामध्ये तूर फुलोरा अवस्थेमध्ये आहे. तूर पिकामध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी एकात्मिक कीड नियंत्रण महत्त्वाचे आहे.
तूर (Tur Pest Management) पिकावरील प्रमुख किडी
शेंगा पोखरणारी अळी/ घाटेअळी : ही अळी विविध पिकांवर दिसून येते. सध्या तूर पिकावर (Tur Pest Management) या किडीचे पतंग अंडी दिसू लागले आहेत. ही अळी नवीन कळ्या तसेच शेंगा खाते. कळी अवस्थेपासून ते शेंगा पक्वतेपर्यंत ही अळी तूर पिकावर दिसून येते. त्यामुळे या अळीमुळे पिकाचे (Tur Pest Management) मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
पिसारी पतंग : पाऊस संपल्यानंतर तूर पिकावर सर्वात आधी या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही अळी तुरीच्या कळ्या, फुले यांना नुकसान करते, त्यानंतर शेंगानाही नुकसान करते.
शेंगमाशी : ही कीड तूर पिकाला (Tur Pest Management) शेंगा लागण्याच्या सुरुवातीला निमुळते अंडे शेंगाच्या पापुद्र्याच्या आत घालते. त्यातून अळी बाहेर पडते. ही कीड तुरीच्या आतील शेंगा पोखरते.
ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी : या किडीचा प्रादुर्भाव फुलोरावस्थेमध्ये होतो. या किडीच्या अंगावर ठिपके दिसतात.
शेंगा ढेकूण : हा ढेकूण पानामधील तसेच शेंगामधील रस शोषण करतो.
पाने गुंडाळणारी अळी : ही पाने गुंडाळणारी अळी पानांचा गुच्छ तयार करते. त्यानंतर पाने खाते. या अळीच्या प्रादुर्भावामुळे अपेक्षेप्रमाणे फुलधारण होत नाही.
पट्टेरी भुंगेरे : तूर पिकाला फुले लागल्यानंतर पट्टेरी भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. हे भुंगेरे फुले व फुलातील परागकण खातात.
खोडमाशी : खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे वाढणारे खोड मलूल होतो. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, पिकाची वाढ कमी झाली आहे तसेच तूर व सोयाबीन आंतरपीक असल्यास या खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त होतो.
तूर पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन (Tur Pest Management)
– पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहित नष्ट करावीत.
– शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
– पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा.
– पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षीथांबे शेतात लावावेत.
– शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी पीक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत.
– तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात.
– पीक कळी अवस्थेत असताना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
– पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना मेटॅरीझीयम अनिसोप्ली हे बुरशीयुक्त कीडनाशक 2 ते 3 मि.ली. व राणीपाल (0.01 टक्के द्रावण) 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची 250 एल. ई. प्रति हेक्टर प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
कीड व किडींची आर्थिक नुकसानीची पातळी
शेंगा पोखरणारी अळी : 2 ते 3 दिवसात सलग 8 ते 10 दिवस पतंग आढळून आल्यास किंवा फुलोरा अवस्थेत 1 ते 2 अळी प्रति झाड किंवा 10 टक्के किडलेल्या शेंगा आढळल्यास
पिसारी पतंग : 2 ते 3 अळी प्रति झाड आढळल्यास
शेंगमाशी : 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा आढळून आल्यास
ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी : 1 ते 2 गुंडाळी प्रति झाड आढळून आल्यास
रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रण
किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर गेल्यावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी : फ्ल्यूबॅडामाईड 39.35 एससी 2 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 एसजी 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी किंवा स्पिनोसॅड 45 एससी 2 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
शेंगा पोखणराणी अळी व शेंगमाशी : लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के ईसी 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी किंवा ल्युफेन्युरोन 5.40 ईसी 12 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 28 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी व पाने गुंडाळणारी अळी : इंडाक्झाकार्ब 15.8 ईसी 6.66 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी किंवा नोवॅल्युरॉन 5.25 + इंडोक्झाकार्ब 4.50 एसी हे कीटकनाशक 16.5 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
शेंग ढेकूण : डायमेथोएट 30 टक्के हे कीटकनाशक 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.