उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये हिंसाचार…! 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू ,काय आहे प्रकरण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हिंसाचार घडला. या हिंसाचारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले आहेत.

या हिंसाचारात चार शेतकरी आणि अन्य चार जण ठार झाल्याचे लखीमपूर खेरीचे जिल्हाधिकारी अरविंद कुमार चौरासिया यांनी सांगितले. या घटनेत शेतकरी नेते ताजिंदर सिंग विर्क जखमी झाले आहेत, अशी माहिती भारतीय किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली. घटनास्थळी एका वाहनात मिश्रा यांचा मुलगा होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. मात्र, मिश्रा यांनी हा आरोप फेटाळला. या हिंसाचारात भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एका वाहनचालकाचा मृत्यू झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

प्रियांका गांधी यांना अटक

या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी हरगावमध्येच अटक केली असल्याचं युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी म्हटलं आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक विडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार शेतकऱ्यांना चिरडण्याचा त्यांना संपवण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.