हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकर्यांना कांद्याने रडवल्याचं आपण पाहतोय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्यांला संकटात लोटलं आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत बाहेर ५० रुपयांनी मागणी असलेल्या कलिंगडाला अवघ्या ८० पैशांचा दर मिळाला आहे. या घटनेमुळे असे झाले तर शेतकर्यांनी करायचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. बाजारात कलिंगडाला अधिक मागणी आहे. कलिंगडाचे दर देखील उत्तम आहेत. असं असलं तरीही शेतकर्यांचा माल मातीमोल भावात विक्री होऊ लागला आहे.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
एकूण तीन एकरांपैकी २ एकरात रामभाऊ रोडगे यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. यामध्ये रोडगे यांना ३ टन कलिंगडाचे उत्पन्न निघाले. या कलिंगडाचे त्यांना ३४०० रुपये मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे रोडगे यांना फक्त ८० पैसे प्रतिकीलो असा भाव मिळाला.
तोडणी खर्च आणि टेम्पो भाडे खर्च भागवायला रामभाऊ रोडगे यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. दोन एकरात लावलेल्या कलिंगडाला रोडगे यांनी एक लाख २० हजार रुपये खर्च करून लागवड केली. कलिंगड त्यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये आणले. कलिंगड काढण्यासाठी अडीच हजार आणि गाडी भाडे साडेचार हजार रुपये तसेच ९६० रुपये हमाली असा एकूण ७०९६० रुपये खर्च आला. यातून केवळ ३४०० रुपये हातात आल्याने रोडगे चकित झाले.