तरुणांचा कल शेळी पालनाकडे ; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर होईल नुकसान

Goat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक तरुणांचा कल हा शेळी पालन करण्याकडे आहे. मात्र शेळी पालन करीत असताना अनेक महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होते. आजच्या लेखात आपण शेळीपालन करीत असताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया …

शेळ्यांचा गोठा कसा असावा?

शेळ्यांच्या गोठ्याची जागा, रचना आवश्यकतेनुसार व वातावरणानुसार आहे का? याची खात्री करा. गोठ्यामध्ये शेळ्या वेगवेगळ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे करुन शारीरिक स्थितीनुसार शेळ्यांची विभागणी करावी. गोठयामध्ये आजारी शेळ्या तसेच नवीन खरेदी केलेल्या शेळ्या ठेवण्यासाठी वेगळी जागा असावी.
वेगवेगळ्या ऋतू नुसार व्यवस्थापनात आवश्यक बदल करावेत. गोठ्याचे आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण करावे. सुरुवातीला खूप मोठा गोठा व खर्च टाळावा.

शेळ्यांची नोंदवही आवश्यक

विविध कामांचे वेळापत्रक बनवावे. नोंदवही मध्ये रोजच्या नोंदी ठेवाव्यात. त्या नोंदींचे वेळोवेळी प्रथक्करण करून आवश्यक बदल करावेत. दैनंदिन व महिनाभराच्या कामांची यादी करावी. गोठ्याची स्वच्छता आणि प्रजनन व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे. योग्य ठिकाणावरून योग्य वयाच्या शेळ्या आवश्यक शारीरिक स्थिती नुसार खरेदी कराव्यात. शेळ्यांची वाहतुकीपूर्वी, दरम्यान व वाहतुकीनंतर योग्य काळजी घ्यावी.

शेळ्यांचे निरीक्षण आवश्यक

शेळ्यांचे निरीक्षण करून त्या कुठल्या रोगांना बळी पडत आहेत का? हे पहावे. वेळोवेळी शेळ्यांमध्ये रक्त, लेंडी च्या नमुन्यांच्या चाचण्या कराव्या. ज्याचा उपयोग योग्य व्यवस्थापनासाठी होईल. लसीकरण व जंत निर्मूलन वेळेवर करावे. मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून आजार ओळखावा आणि इतर शेळ्यांवर त्यानुसार उपचार करावेत. प्रथमोपचारानंतर शेळ्या बऱ्या होण्याची वाट बघण्यापेक्षा तज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी, उपचार व मार्गदर्शन घ्यावे. निरुपयोगी शेळ्या गोठ्यातून काढून टाकाव्यात. शेळ्यांचा विमा उतरवावा. कमीत कमी शून्य टक्के मरतुक आणि बोकडांमध्ये चांगली वजन वाढ व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी या दोन गोष्टी आवश्यक आहेत.रोगाची लागण झाल्यावर उपचारांवर जास्त खर्च करण्यापेक्षा गोठ्यावर रोग येणारच नाही असे व्यवस्थापन करावे.

खाद्याचे व्यवस्थापन

चारा पिकांची लागवड करून ओला चारा, सुका चारा व खुराकाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेळ्यांमध्ये योग्य वेळी योग्य खाद्याची यादी बनवावी. शेळ्यांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी. शेळ्यांचा चारा गव्हाणीत द्यावा जेणेकरून तो वाया जाणार नाही. शेळ्यांना आवश्यकतेनुसार खनिज मिश्रण द्यावे.

विक्री नियोजन कसे करावे?

स्वतःचे मटणाचे दुकान असल्यास जास्तीत जास्त फायदा मिळतो. शेळीच्या मटणाच्या निर्यातीवर लक्ष व भर दिल्यास भरपूर फायदा होतो. दुसऱ्याचा गोठा बघून कॉपी करण्याचा प्रयत्न न करता आपल्या स्थितीनुसार नियोजन केल्यास जास्त फायदा होतो. शेळ्या जिवंत वजनावर विकणे फायदेशीर असते. विक्री व्यवस्थापनासाठी आपल्याकडे स्थानिक जत्रांची यादी करून पूर्वनियोजन करून विक्री करावी. स्वतःच्या शेळ्यांची विक्री करताना सरळ शेवटच्या ग्राहकांशी व्यवहार केल्यास जास्तीत जास्त फायदा मिळतो.

प्रजनन व्यवस्थापन

शेळ्यांपासून दोन करडे मिळावीत व दोन वेतातील अंतर जास्तीत जास्त आठ महिने असावे. शेळ्यांची वंशावळ बघून व जातिवंतपणा बघून पैदास करावे व पैदाशीच्या शेळ्या म्हणून विक्री करावी. एकावेळी वीस अधिक एक पेक्षा मोठ्या संख्येने सुरुवात केल्यास जास्त अडचणी येतात. नवीन शेळ्या कमीत कमी २१ दिवस गोठ्यावरील जुन्या शाळांमध्ये मिसळणे टाळावे. बोकडांचे विक्री नियोजन करावे व त्यानुसार पैदास करावी.