हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बहुतांश शेतकरी नैसर्गिक शेतीकडे (Natural Farming) वळत आहेत. यासाठी आत्मा आणि वेगवेगळ्या संस्थांतर्फे शेतकर्यांना प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी मिशन राबवविले जाते. नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचा (Dr. Panjabrao Deshmukh Natural Farming Mission) सुद्धा मोठा सहभाग आहे. या मिशन अंतर्गत 7 हजारापेक्षा अधिक शेतकर्यांनी (Farmers) सहभाग नोंदवत नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या सेंद्रिय शेतीची (Organic Farming) कास धरली आहे. याअंतर्गत 17 हजार एकरपेक्षा अधिक शेती (Natural Farming) विषमुक्त पिकांच्या लागवडीखाली आली आहे.
गेल्या काही वर्षांत शेतजमिनीत रासायनिक खत आणि प्रक्रिया केलेल्या बियाणांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रसायनांचा प्रवेश झाला. यामुळे जमिनीचा कस बिघडण्यासोबतच मानवी शरीरावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पिकणारी शेती करणे काळाची गरज आहे. तसेच सेंद्रिय शेत मालाला (Organic Products) दर सुद्धा चांगला मिळतो. ही बाब पटल्याने 7 हजारापेक्षा अधिक शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीची (Natural Farming) कास धरल्याची माहिती आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी दिली.
विषमुक्त शेती काळाची गरज
रासायनिक खताच्या वापराने (Chemical Fertilizers Side Effects) पिकविल्या जाणाऱ्या अन्न धान्यातील घटक विविध आजार व विकारास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सकस आणि जीवनसत्वयुक्त आहार मिळण्यासाठी विषमुक्त शेतीची (Natural Farming) कास धरणे काळाची गरज आहे.
गतवर्षी तयार झाले 70 शेतकरी गट
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती (Natural Farming) मिशन अंतर्गत गतवर्षी मंगरूळपीर तालुक्यात 20 आणि अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी 10 असे 70 शेतकरी गट तयार झाले आहेत. प्रत्येकी 50 शेतकर्यांच्या या गटांनी नैसर्गिक शेतीचा प्रयोग पूर्णता यशस्वी करून दाखविला आहे.
शेतकरी गटांना ‘आत्मा’कडून प्रशिक्षण
नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जिल्ह्यात गतवर्षी स्थापन झालेले 70 आणि चालू वर्षी तयार केल्या जात असलेल्या शेतकरी गटामधील सदस्य शेतकर्यांना ‘आत्मा’ (ATMA) कडून शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात दशपर्णी अर्क, निबोळी अर्क, जीवामृत तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन केले जात आहे. उत्पादीत सेंद्रिय माल विक्री करण्यासाठी देशातील विविध कंपन्या सोबत करार केला जाणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी दिली.
पारंपरिक पद्धतीला दिले जातेय प्राधान्य
नैसर्गिक शेती (Natural Farming) मिशनमध्ये सहभागी शेतकरी गटांकडून पारंपरिक पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. याअंतर्गत दशपर्णी अर्क, जिवामृत, निंबोळी अर्क, घन जिवामृत, बुरशीनाशक स्वत:च तयार करून पिकांची काळजी घेतली जात आहे.