हॅलो कृषी ऑनलाईन : आजकालच्या तरुणाईला तुम्ही कोणते करिअर निवडणार ? असा प्रश्न विचारल्यास आपसूकच ,डॉक्टर ,इंजिनिअर,उद्योजक,संशोधक अशी उत्तरं येतात. पण मला उत्कृष्ट शेतकरी व्हायचंय … असं उत्तर मिळणं कठीणच. मात्र अमरावती जिल्ह्यातल्या एका तरुणांने मात्र उत्कृष्ट शेतकरी होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अवघ्या २४ वर्षांचा हा तरुण आपल्या वडिलोपार्जित शेतात शेतीचे विविध प्रयोग करून एखाद्या इंजिनिअरलाही लाजवेल असे उत्पन्न घेतो आहे.
या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे किरण मनोहर इंगळे. अमरावती जिल्ह्यातल्या मंगळूर दस्तगीर याठिकाणी तो राहतो. पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित १० एकर शेती त्याच्या वडिलांना मिळाली आहे. वडिलांच्या मदतीने किरण देखील शेतात राबतो. पारंपरिक शेतीबरोबर काही आधुनिक प्रयोग शेतीत करून चांगले उत्पन्न तो घेत आहे.
किरणने आपल्या शेतात भाजीपाल्याची लागवड केली आहे. कोरोनाकाळात देखील त्याने शेतात भाजीपाल्याची लागवड केली होती. मात्र हवे तसे उत्पन्न मिळाले नसल्याचे त्याने सांगितले. मात्र यावेळी टमाटर, वांगे, संत्रा, चवळी, मिरची, कोबी, कांदा याची लागवड केली असून आतापर्यंत किरणने १५ लाखांचे उत्पन्न शेतातून घेतले आहे. यापुढे देखील त्याला ५ लाखांचा नफा होईल असे तो सांगतो. शिवाय शेती ही नेहमीच चांगली असते मात्र शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळायला हवे असे देखील त्याने सांगितले.