हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेता केंद्र सरकार कडून सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला जात आहे. एव्हढेच नाही तर सेंद्रिय शेतीकरिता दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार आहेत. उत्पादनात वाढ आणि आवश्यक साधनसामुग्रीकरिता शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जाणार आहे. नैसर्गिक शेतीकरिता दोन योजना राबवल्या जाणार असल्याचे कृषी कल्याण राज्य मंत्री कैलास चौधरी यांनी लोकसभेत सांगितले.
यावेळी बोलताना चौधरी यांनी सांगितले की , सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आणि 3 वर्षांसाठी तात्पुरती मदत करणार त्यामुळे हेक्टरी 31 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्याचबरोबर मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्याचे कोणतेही कर्ज, दर्जेदार बियाणे, प्रक्रिया आणि इतर कामांसाठी हेक्टरी 46 हजार 575 रुपये प्रति हेक्टर 3 वर्षांसाठी दिले जाणार आहेत.शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून 2015-16 पासून या दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक कृषी योजना आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनांचा समावेश असणार आहे. या योजनांच्या माध्यमातून पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे विषय असणार आहेत. सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी केंद्राचा प्रयत्न असला तरी शेतकऱ्यांनाही तेवढाच फायदा होणार आहे. 2013 साली सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून 1 लाख 77 हजार टन शेतीमालाचे उत्पादन झाले होते तर यंदा ते 8 लाख 8 हजारावर पोहचले असल्याचे मंत्री कैलाश चौधरी यांनी सांगितले आहे.
सेंद्रिय शेतीसाठी अॅप
–सेंद्रीय शेतीची माहिती आणि त्याचे फायदे बांधावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने एक अॅप तयार केले आहे.
–यामध्ये उत्पादन, शेतीमालाचे दर आणि भविष्यातील मार्केट यासंबंधी माहिती मिळणार आहे.
— आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून 5 लाख 73 हजार शेतकरी हे जोडले गेले आहेत.
–यामध्ये किसान पोर्टल आणि त्यांच्या बायो-उत्पादनांचा तपशील अपलोड केला जातो.
–यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करणे अधिक सोईस्कर होणार आहे.