हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीत एकीकडे नागरिकांना मोफत वीज मिळत असताना दुसरीकडे आता पंजाबलाही मोफत वीज मिळणार आहे. वास्तविक, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (आप) सत्तेत येताच कारवाई सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केले की पंजाबमधील नागरिकांना आता 1 जुलैपासून 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यातील जनता मात्र सध्या लोडशेडिंगचा झटका सहन करीत आहे. शिवाय शेतकऱ्यांना तर रात्रीच विजेचा पुरवठा शेतीसाठी केला जात आहे. एकीकडे दुसरी राज्ये विजेच्या बाबतीत चांगले निर्णय घेत असताना असे निर्णय महाराष्ट्रात कधी लागू होणार ? किंवा असा कायदा महाराष्ट्रात का नाही ? असा सवाल नक्कीच उपस्थित होतो.
मोफत वीज हे पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी AAP ने दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक होते. निवडणूक जिंकल्यास प्रत्येक घराला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल, अशी घोषणा आप सरकारने केली होती.काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबच्या गावांमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना चुकीची बिले आली आणि त्यांचे वीज कनेक्शन न भरल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आणि अशा लोकांनी वीज चोरीचा मार्ग अवलंबला होता, परंतु आता या गोष्टींवर बंदी घालण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात मात्र विजेचा डबल शॉक
महाराष्ट्रात वीज पुरवठ्यामुळे आणि कोळसा दरवाढीमुळे प्रकाश नाहीतर अंधाराची चिन्ह दिसू लागली आहे. महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागतो आहे. कोळसा दरवाढीमुळे ग्राहकांना 10 ते 60 रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक युनिट मागे 10 ते 25 पैसे युनिट प्रमाणे महागणार आहे. वीज निर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा महागल्याने वाढीव खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना 10 ते 25 पैसे प्रति युनिट प्रमाणे जास्त आकारावे लागतील.
महावितरणाने लोडशेडींग चालू करून पहिलाच ग्राहकांना शॉक दिला होता. तर आता पुन्हा प्रति युनिट मागे दर वाढ केल्यामुळे दरवाढीचा देखील शॉक ग्राहकांना बसला आहे. लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागातून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी दिवसभर उच्चांकी गाठलेल्या उन्हामध्ये राब राब राबतोय आणि संध्याकाळी लोडशेडींग असल्यामुळे त्याला फॅनची हवा सुद्धा नशीब होत नाही. तर असंख्य ग्रामीण भागातील कुटुंबांना अंधारातच जेवण करावे लागते. कारण ग्रामीण भागातील बहुतांश भागात लोडशेडिंगचा टाईम हा संध्याकाळी सात वाजेपासून ते रात्री 10, 11 आणि 12 वाजेपर्यंत देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना हा डबल झटकाच मानावा लागेल.