हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये अद्यापही ऊस शिल्लक आहे. कडक उन्हामुळे उसाचे अक्षरश: चिपाड व्हायची वेळ आली आहे . मात्र अद्यापही अतिरिक्त उसाचा प्रश्न बाकी आहे. पावसाळ्यापूर्वी अतिरिक्त उसाचा गाळप होणे गरजेचे आहे. अन्यथा कधीही भरून न निघणारे नुकसान होणार आहे. यावर आता शेवटचा पर्याय म्हणून परराज्यातील यंत्रही ऊसतोडीसाठी राज्यातील विविध भागांमध्ये दाखल होणार आहेत. सहकारी साखर कारखाना महासंघानं ही यंत्र मागवली आहेत. अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटवण्यासाठी गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत ही यंत्र राज्यात दाखल होणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऊस तोडणीला सुरुवात होणार आहे. सलग महिनाभर ही तोड झाल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्नही केले जाणार आहेत.
यंदाच्या हंगामात पाण्याची चांगली उपलब्धता झाल्यामुळे मराठवाड्यासारख्या क्षेत्रांमध्ये देखील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे मात्र तोडणी अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे मराठवाड्यातील परभणी जालना हिंगोली लातूर जिल्ह्यांमधील अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय राज्यातील अन्य भागातही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे कारखान्यांची क्षमतेपेक्षा अधिक गाळप करूनही ही अवस्था झाली आहे केवळ पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडीचे योग्य नियोजन झाला आहे.
ऊस हंगाम हा बराच लांबला आहे अजूनही प्रत्यक्षात 80 लाख टन उसाचे गाळप बाकी आहे अशातच ऊसतोड मजुरांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे उसाचा तोडणी चा प्रश्न हा कायम राहिला आहे. विशेषतः मराठवाड्यात भयानक परिस्थिती असून शेतकरी ऊस पेटवून क्षेत्र रिकामे करू लागलाय. सर्वात मोठ्या नगदी पिकाची ही अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यास उसाचे क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी शाश्वत उत्पन्न म्हणून ऊस पिकाकडे पाहिलं जातं.