हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे व्यापाऱ्यांकडून व्यवहार ठरवले मात्र ऐन वेळी अवकाळीने सर्व माल खराब झाला. आता सुद्धा तासगाव शहरासह तालुक्यातील विविध भागाला गारपीट आणि पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार छाटणीचे संकट ओढवले आहे.
तासगाव शहरासह तालुक्यातील मणेनेराजुरी, योगेवाडी या भागाला वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झोडपले. दुपारी चारच्या दरम्यान ही गारपीट पंधरा मिनिटे सुरू होती. यामुळे आगाप द्राक्षबागांची छाटणी करून फुटलेल्या काड्यांना गारांचा मारा बसत जखमा होत काड्या मोडल्या तर पाने तुटून पडली. यामुळे या बागांना द्राक्षे न येण्याचा मोठा धोका आहे. या गारपिटीने मोठे क्षेत्र बाधीत झाल्याचे शेतकऱयांनी सांगितले.
गेली चार वर्षे गारपिटीचा तडाखा तासगाव तालुक्यातल्या द्राक्षबागायतदारांना बसतो आहे. गारा व पावसाने आंबा, व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळीने शेतकरी चांगलाच गारठला आहे. या गारा पंधरा ते वीस मिनिटे गारा सुरू होत्या. यामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांवर दुबार छाटणी घेण्याची वेळ येणार आहे. मात्र दोन वर्षापूर्वी दुबार छाटणी केलेल्या येळावीतील बागांना माल आला नाही. आता जखमी काड्यांना माल येईल याची खात्री नसल्यामुळे शेतकरी हबकला आहे. आगाप बागांवर पुन्हा दुबार छाटणीची टांगती तलवार आहे. द्राक्षांसोबत , ऊस, आंबा, भाजीपाला, केळी यांसह अन्य पिकांना गारपिटीचा झटका बसला आहे. वादळी वाऱ्याने तासगाव शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. तासगाव तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या काही वाहनांवर झाडे मोडून पडल्याने त्यांचे नुकसान झाले.