हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमाल बाजारात पोहविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पाणंद रस्ते 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी येथे दिला. अमरावती शहरातील नियोजन भवन येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल, अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अकोला जिल्हाधिकरी निमा अरोरा, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शेती व शेती पूरक उद्योगांचा विकास करण्यासाठी गूणवत्तापूर्ण पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून रोहयो मंत्री श्री. भूमरे म्हणाले की, दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे. पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामासाठी आवश्यक साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. यासाठी मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजे 15 जूनपर्यंत पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण करावे. असे आदेश दिले.