हॅलो कृषी ऑनलाईन: परभणी प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात खरिप हंगामाचे 5 लाख 68 हजार हेक्टर क्षेत्र असून या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, रासायनीक खते आणि पिक कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात 1 मे रोजी खरीप हंगाम पुर्व नियोजन, पाणी टंचाई आढावा व रमाई आवास घरकुल ग्रामीण निर्माण समिती बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री मुंडे हे बोलत होते. या यावेळी बैठकीस खासदार संजय जाधव, खासदर फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ.राहूल पाटील, मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे, बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री धनंजयमुंडे म्हणाले की, परभणी येथे आयोजित करण्यात आलेली खरीप हंगाम पुर्व नियोजन बैठक बहूतेक यावर्षी महाराष्ट्रात होणारी पहिली खरीप हंगाम पुर्व बैठक असेल. यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्वनियोजन करण्यासाठी खुप वेळ मिळाला आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून येण्यासाठी योग्य पुर्व नियोजन फार महत्वाचे आहे. पात्र शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळाले तर चांगले परिणाम निश्चितच दिसून येतील. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि तालूका कृषि अधिकाऱ्यांनी तालूक्याच्या कृषी केंद्र चालकांची बैठक घेवून बियाणे आणि खतांची मागणी जाणून घ्यावी. तसेच त्यांना कमतरता कशाची भासत आहे याचा संपुर्ण अभ्यास करुन जिल्हा कार्यालयास अहवाल द्यावा अशी सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बि-बियाणे व रासायनिक खते मिळतील याची संबंधीतांनी काळजी घ्यावी. तसेच नफेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या .