हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो भात किंवा तांदूळ म्हंटलं की आपल्यासमोर पांढरा तांदूळ येतो. मात्र बिहारमधल्या चंपारण मधील एक शेतकरी रंगीत तान्दळाची शेती करतो. एवढेच नव्हे तर तो अशा मॅजिक तांदळाची शेती करतो जे तांदूळ थंड पाण्यातही शिजतात. आजच्या लेखात जाणून घेऊया या अनोख्या शेतीबद्दल.

चंपारणच्या रामनगर पंचायतीत राहणारे विजयगिरी हे हिरव्या, काळ्या, लाल, रंगाच्या तांदळाच्या शेतीबरोबरच मॅजिक तांदळाची देखील शेती करतात. मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असलेल्या या तांदळाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे तथ्य कृषी संशोधन केंद्रानेही प्रकाशित केले आहे.
विजय गिरी यांनी पारंपारिक शेती सोडून काही नवीन प्रयोग करायचे डोक्यात आणले आणि त्यानुसार हिरव्या, काळया आणि लाल तांदळाची शेती करायला सुरुवात केली. ते सेंद्रिय पद्धतीने शेती करतात त्यांचा दावा आहे की सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यानं पर्यावरणाचे संरक्षण होतं तसंच शेतीमध्ये देखील अधिक उत्पादन मिळते. रंगीत तांदळाच्या लागवडीने त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे आणि चांगले उत्पादनही मिळत आहे असे त्यांनी सांगितले आहे.

मॅजिक तांदळाची शेती
विजय गिरी सांगतात की मॅजिक तांदूळ याची देखील ते शेती करतात. या तांदळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तांदूळ थंड पाण्यात सुद्धा शिजते. या प्रजातीच्या तांदळाची शेती करून ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत. शिवाय त्यांच्या बरोबरच देशातील एकूण 30 ते 40 हजार शेतकरी त्यांच्या या मोहिमेमध्ये जोडले गेलेले आहेत. जे प्रत्येक वर्षी हिरव्या, लाल, काळ्या आणि मॅजिक तांदळाची शेती करतात. मात्र या तांदळाची शेती करत असताना काही गोष्टी लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
रामनगर येथील कृषी पदाधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले की शेतकरी विजयगिरी ही तांदळाची शेती अनेक दिवसांपासून करत आहेत. शिवाय ते या तांदळाची विक्री चांगल्या पद्धतीने करतात. विजय गिरी यांना त्यांच्या या तांदूळ उत्पादनाच्या कार्याबद्दल जिल्हा आणि राज्यस्तरावर देखील पुरस्कार देण्यात आले आहेत.