Farmers Suicide : ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ शिंदे सरकारचा संकल्प मात्र राज्यात चित्र वेगळेच ; 24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन खरिपाच्या पेरणीच्या काळात शेतकरी (Farmers Suicide) शेतात चांगलं पीक यावं म्हणून धडपड करीत होता आणि दुसरीकडं राज्यात सत्तानाट्य चालू होतं. त्यातही शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री होताच ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ करू अशी घोषणा केली. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना होऊन अवघे २४ दिवस उलटले असताना राज्यत तब्बल 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय… मग नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ हवेतच विरल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) होऊ नये त्यासाठी देखील मार्ग काढला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार कटीबध्द आहे. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे जीवन बदलले पाहिजे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हा संकल्प करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या 24 दिवसांमधील चित्र हे वेगळे असून राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

यंदाचा खरीप हंगाम संकटात

राज्यात चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता त्यामुळे शेतकरी खुश होता. मात्र जून महिना पूर्ण कोरडाच गेला. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी काही भागात साठवलेल्या पाण्यावर पेरण्या केल्या मात्र जुलै महिन्यात एवढा पाऊस झाला की, वावरात उगवलेली पिकं वाहून गेली. काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या. तर काही ठिकाणी गोगलगायी आणि किडींची आक्रमण करून पिकेच्या पिके उद्धवस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचे संकट ओढवलं. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती लागणार की नाही या विवंचनेत अद्यापही शेतकरी आहे.

राज्यात कृषी मंत्रीच नाही

राज्यात शिंदे सरकार ची स्थापना होऊन २४ दिवस उलटून गेले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना कृषी खातं दादा भुसे त्यांच्याकडे होतं. मात्र ते देखील शिंदे गटात सामील झाले. कृषी क्षेत्र हे राज्यात सर्वात महत्वाचे क्षेत्र असताना अद्यापही राज्याला कृषी मंत्री (Farmers Suicide) मिळाला नाहीये. शिवाय नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 जुलैपासून प्रोत्साहनपर रक्कम मिळणार होती त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा केवळ हवेतच विरताना दिसत आहेत.

मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. शिवाय सरकारच्या घोषणा ह्या हवेतच विरलेल्या आहेत. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे गेल्या 24 दिवसांच्या काळात मराठवाडा विभागात 54 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. उत्पादनवाढीसाठी शाश्वत उपाययोजनेचा आभाव आणि निसर्गाचा लहरीपणा अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मराठावाड्यानंतर यवतमाळमध्ये 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव-6, बुलाडाणा-5, अमरावती-4, वाशिम-4, अकोला-3 तर चंद्रपूर-भंडारामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!