गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना NDRF निकषांच्या तिप्पट मदत द्या: धनंजय मुंडे

Dhananjay Munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी सोयाबीन पिकाचे गोगलगायींचा प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले आहे. ह्याच मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर धनंजय मुंडे यांनी लक्ष्यवेधीवर बोलताना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही, अशा शेतकऱ्यांना कपाशीवर पडलेल्या बोंडअळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली. त्याप्रमाणे गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्यसरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली.

५ आधिकऱ्यांची समिती नेमणार

मुंडे यांच्या मागणीला उत्तर देताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा 5 अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं.