खरीप पिकामध्ये आंतरमशागतीचे नियोजन कसे कराल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या स्थितीत पिकांमध्ये आंतरमशागत महत्वाची आहे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पिकाच्या मुळाशी हवा खेळती राहते. याचा फायदा पिकाबरोबरच जमिनीतील सूक्ष्म जिवांच्या कार्यासाठी होतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप पिकातील आंतरमशागतीचे महत्व आणि नियोजनाविषयी पुढील माहिती दिली आहे.

पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करावी. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्या नंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी.

पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे. मात्र खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे.

पिकांच्या दोन ओळीत सेंद्रिय पदार्थांचे, उदा. गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तुरकाठ्या, ज्वारीची धसकटे, उसाचे पाचट, पिकांचा टाकाऊ भाग इत्यादी आच्छादन म्हणून वापरावे. साधारणपणे प्रती हेक्टरी पाच टन या प्रमाणात सेंद्रिय आच्छादकाचा वापर करावा.

आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादी फायदे होतात.

खांदणी आंतरमशागत

खांदणी मुख्यतः ऊस, आले, बटाटा, हळद, भुईमूग इत्यादी पिकांसाठी केली जाते. उसासाठी खांदणी ही महत्त्वाची आंतरमशागत आहे, यामुळे पाणी एकसारखे बसते, शिवाय पीक लोळत नाही. उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळबांधणी व ४ ते ५ महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी.

आंतरमशागतीचे नियोजन

आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो. तुरीच्या जोमदार वाढीसाठी १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस शेत तणविरहीत ठेवावे.

–सोयाबीन पिकाची लागवड रुंद वरंबा सरीवर केली असल्यास रिकाम्या सरीमध्ये तण राहणार नाही याची काळजी घ्यावी.

–हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवांचे असतांना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

–भुईमुग पिकात, १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व दोन खुरपण्या घ्याव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नये.

–सूर्यफूल पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी करावी, दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.

–भाजीपाला पिकांमध्ये आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवश्यकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्याव्यात. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारावी.

 

Leave a Comment

error: Content is protected !!