राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; १४, १५ ऑक्टोबरला जोर वाढण्याचा अंदाज

Heavy Rainfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं वातावरणात बदल झाला आहे. या हवामान बदलामुळं राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ओडिशामध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. १३ ऑक्टोबरला हे क्षेत्र नरसापूर आणि विशाखापट्टणम जवळ जमिनीवर येईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय.

आज दुपारपासूनच पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, तर, नवी मुंबई, पनवेल परिसरातही विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसांत, राज्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही भागात ऑक्टोबरमध्येही विजांचा कडकडाट अनुभवायला मिळत आहे. ऑक्टोबरचा मध्य आला तरी अजूनही पावसानं राज्यातून माघार घेतलेली नाही. गेल्या दोन- तीन दिवसांपासून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही सुरू आहे. यामध्ये शुक्रवारपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.