Agriculture News : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून मराठवाड्यात पावसाने दडी मारली आहे. काही ठिकाणे सोडली तर मराठवाड्यामध्ये कोणत्याच ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी देखील चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी पावसाच्या जीवावर पेरणी केली होती. मात्र सध्या कडक ऊन आणि ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्याची उगवून आलेली पिके देखील सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे.
मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या मागील वीस दिवसात फक्त 35.1 मी मी पाऊस झाला आहे. म्हणजेच फक्त 28.1% पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक देखील चिंतेत आहेत. मराठवाड्यात सध्या ऑगस्ट महिन्यात ७१.९% तूट पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची 49 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला होता त्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र आता सध्या पिके सुकू लागली असून त्यांना पाणी कुठून द्यावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (Agriculture News : )
पाणीटंचाईचा सामना करावा लागणार
पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना तर मोठा फटका बसतच आहे मात्र याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना देखील बसणार आहे. कारण अनेक धरणांमधील पाणीसाठा कमी आहे. त्याचबरोबर उन्हामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे धरणातील पाणीसाठा आटला आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही तर मराठवाड्यात मोठा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असे झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळेल.
मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम जवळपास शेतकऱ्याच्या हातून गेले होते. मात्र या वर्षी शेतीतून काहीतरी उत्पन्न निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र मान्सून उशिरा दाखल झाल्याने अद्यापही पाऊस पुरेसा झालेला नाही त्याचबरोबर ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पिकांना पावसाची अत्यंत गरज असून पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी दिवसात पाऊस न झाल्यास शेकर्यांना खरीप पिकाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होणार आहे.