हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या मधमाशीपालन व्यवसाय (Bee Keeping Business) चांगलाच विस्तारला आहे. राज्य सरकारनेही मधमाशीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘मधाचे गाव योजना’ सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र मधमाशांपासून केवळ मधच नाही तर त्यांच्या विषापासून देखील अनेक आजारांवर औषधे बनवली जातात. परिणामी बाजारात मधासोबतच मधमाशांच्या विषाला देखील मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी मधमाशीपालनातून (Bee Keeping Business) मधासोबतच मधमाशींचे विष जमवून देखील अधिक नफा मिळवू शकतात.
किती मिळतो दर? (Bee Keeping Business In India)
पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माहितीनुसार, मधमाशीपालनातून (Bee Keeping Business) केवळ मधच नाही तर त्यांच्या अन्य पदार्थांपासून कमाई साधन निर्माण होते. यात प्रामुख्याने मधमाशीच्या रॉयल जेलीपासून एड्ससारख्या घातक आजारावर औषध तयार केले जाते. याशिवाय मधमाशीच्या विषापासून अनेक आजारांवरील औषधे तयार केली जातात. ज्यामुळे मधमाशांच्या या पदार्थांना फार्मा सेक्टरमधील कंपन्यांकडून मोठी मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात मधमाशीच्या विषाला 10 से 15 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. जो सोनाच्या किमतीपेक्षाही अधिक आहे. इतकेच नाही तर जगातील अनेक संशोधकांकडून मधमाशीच्या विषावर अभ्यास केला जात आहे. असेही संस्थेने म्हटले आहे.
‘या’ आजारांवर अत्यंत गुणकारी
प्राचीन काळापासून एपिथेरपीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. एपिथेरपी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मधमाशीची उत्पादने आजारांच्या निराकरणासाठी वापरली जातात. मधमाशीचे विष हे संधिवात, स्क्लेरोसिस, ल्युपस, पाठदुखी, कंबरदुखी आणि कोपराच्या वेदना यासारख्या गंभीर परिस्थितींवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. या आजारांवर उपचार करण्यासाठी मधमाशीचे विष अत्यंत गुणकारी मानण्यात आले आहे. मधमाशीच्या विषामध्ये अनेक एंजाइम आणि पेप्टाइड्ससह जवळपास अन्य 18 औषधी घटक असतात. त्यामुळे मधमाशीचे विष हे मानवी आजारावरील उपचारांसाठी सुरक्षित मानले गेले आहे.
मधमाशी व्यवसायाचे वैशिष्ट्ये
- मधमाशांपासून मिळणारे मध हे मानवासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. मधमाशी फुलांमधील मकरंद गोळा करून, तिच्या पोळ्यामध्ये साठवते. साधारणपणे मधमाश्यांच्या एका पोळ्यात 20,000 ते 60,000 मधमाश्या असतात.
- मधमाशीच्या शरीरात पोटाचे दोन कप्पे असतात. यामध्ये एका कप्यात ती स्वतःचे अन्न खाते. तर दुसऱ्या कप्प्यात फुलांचा मकरंद गोळा करते.त्यानंतर त्या मकरंदमध्ये स्वतःमधील एन्झाईम टाकून ती पोळ्यात उलटी करून बाहेर काढते, जे आपल्याला मधाच्या रूपात मिळते.
- जेव्हा मधमाशीला काही धोका संभवतो. तेव्हा ती विशेष प्रकाराने नृत्य करते. यामध्ये प्रामुख्याने ती 8 च्या आकारात फिरू लागते.
- मधमाशी माणसाला जेव्हा चावा घेते. तेव्हा त्याला खूप त्रास होतो. कारण तिच्या डंकामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते. मधमाशीच्या डंकामध्ये मॅलिटिन नावाचे विष असते. जे बाह्य संरक्षणात्मक थराला छेदते. ज्यामुळे विषाणू नष्ट होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.