हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) मृत्यू झालेल्या 22 वर्षीय शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी अखेर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभकरण हा पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावचा रहिवासी होता. ज्याचा 21 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्ली येथील खानोरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनादरम्यान हरियाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मृत्यू झाला होता. तरुण शेतकरी शुभकरण सिंह याच्या घरच्यांनी जोपर्यंत गुन्हा (एफआयआर) दाखल होत नाही. तोपर्यंत शुभकरण याच्यावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आज अखेर पंजाब पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, शेतकरी शुभकरण (Farmers Protest) याच्यावर नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कारवाई (Farmers Protest In Delhi)
पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील पांतड़ा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबचे पोलिस महानिरीक्षक सुखचैन सिंह गिल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शेतकरी शुभकरण सिंह मृत्यूप्रकरणी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन, पंजाब पोलिसांकडून झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाचा, तर कलम 114 देखील याप्रकरणी लावण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी शुभकरण सिंह याचे वडील यांनी हा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यात ‘अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा’ अशी नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळ शेतकरी आंदोलनाचे हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यातील गढ़ी येथील खानोरी बॉर्डर नोंद करण्यात आले आहे.
आज होणार अंतिम संस्कार
दरम्यान, शेतकरी आंदोलन करणारे शेतकरी नेते या मागणीवर अडून होते की, शुभकरण याचे पोस्टमोर्टम करण्यापूर्वी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्याने, शुभकरण याच्यावर नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकरी शुभकरण याच्या मृत्यूप्रकरणी, त्याच्या कुटुंबियांना 1 कोटींची आर्थिक मदत करण्याची आणि त्याच्या बहिणीला सरकारी नोकरीची घोषणा 22 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे.