हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता मिश्र खतांच्या आणि रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खताच्या वाढलेल्या किमती वरूनच भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना थेट पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किमती मध्ये केलेल्या अत्याधिक दरवाढीला राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. महामारी च्या संकटात अन्नदाता बळीराजा वर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तत्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे. असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सरकारला पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दुष्काळात तेरावा महिना
लॉक डाऊन मुळे शेतमाल विक्री करता न आल्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला यावर्षी खताचे भाव वाढल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणायची वेळ आली आहे यातच केंद्र सरकारने दर कमी करावेत अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे असं असताना प्रीतम मुंडे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची परिस्थिती कळवत रासायनिक आणि मिश्र खतांचे भाव कमी करावेत अशी मागणी केली आहे.
यावर्षी बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना पेरणी कशी करावी हे त्याच्या समोरच एक मोठे संकट आहे. यातच खतांचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. असे मुंडे यांनी म्हटलं आहे.