हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी ट्रॅक्टर (New Tractor Launch) खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असते. मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर हे शेतीतील मूलभूत यंत्र झाल्याने, आजकाल ट्रॅक्टर खरेदी करणे सर्वच शेतकऱ्यांना क्रमप्राप्त ठरत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी व्हिएसटी झेटोर प्रायव्हेट लिमिटेड, व्हिएसटी टील्लर ट्रॅक्टर्स लिमिटेड आणि एचटीसी इन्वेस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल झाले आहेत. व्हिएसटी झेटॉर 4211, व्हिएसटी झेटॉर 4511 आणि व्हिएसटी झेटॉर 5011 (New Tractor Launch) अशी ही तीन नवीन मॉडेल्स 41 ते 50 एचपी क्षमतेची आहेत.
किती आहे किंमत, वैशिष्ट्ये? (New Tractor Launch For Farmers)
विशेष म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांना या तीनही नवीन ट्रॅक्टरचा विशेष फायदा होणार आहे असा कंपनीकडून दावा केला जात आहे. या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक डीआय इंजिन, हेलिकल गियर्स, मजबूत ट्रान्समिशन आणि व्हीझेड मेटिक हायड्रोलिक्स यंत्रणा बसवण्यात आली आहे. केवळ शेतीच्या कामांसाठीच नाही तर वाहतुकीसाठी देखील या तिन्ही ट्रॅक्टरचा विशेष वापर करता येणार आहे. असेही कंपनीने म्हटले आहे. या तीनही ट्रॅक्टर किंमत कंपनीकडून 8 ते 9 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
अन्य अवजारेही विकसित
शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ई अस्त्रा एनएसीओएफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडनेही पुढाकार घेतला आहे. या कंपनीने शेतकऱ्यांसाठी विविध इलेक्ट्रिक अवजारे विकसित केली आहेत. ई-वीडर, ई-रीपर, ई-ब्रश कटर आणि ई-कार्गो मल्टी-युटिलिटी थ्री व्हीलर ही यात समाविष्ट आहेत. देशातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा. यासाठी इलेक्ट्रिक उपकरणांवर भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या नवीन उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल आणि त्यांच्या कामात अधिक कार्यक्षमता येईल. असे सांगितले जात आहे.