हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात इतर पिकांसोबत शेतकरी हळद लागवड (Halad Lagwad) करतात. चांगल्या जातीची निवड आणि आधुनिक लागवड पद्धती यामुळे हळद पिकाचे चांगले उत्पादन मिळते. या लेखात जाणून घेऊ या हळदीच्या सुधारित जाती (Turmeric Varieties) आणि लागवड पद्धती (Halad Lagwad).
हळद लागवड कालावधी (Turmeric Sowing Time)
हळदीची पेरणी (Halad Lagwad) 15 मे ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. सिंचनाची सोय असल्यास अनेक शेतकरी एप्रिल-मे महिन्यातही पेरणी करतात.
जमीन आणि हवामान
हळदीसाठी वालुकामय व चिकणमाती जमीन उत्तम आहे. हळद लागवड करण्यापूर्वी जमिनीचा चांगला निचरा झाला असल्याची खात्री करा. पाणी साचलेल्या जमिनीत हळद नीट वाढू शकत नाही.
हळदीची लागवड (Halad Lagwad) उष्ण व दमट हवामान असलेल्या भागात केली जाते. या पिकाच्या वाढीसाठी इतर पिकांपेक्षा जास्त खतांची आवश्यकता असते.
हळदीच्या सुधारित जाती (Turmeric Improved Varieties)
आर एच 5, राजेंद्र सोनिया, पालम पितांबर, सोनिया, सुगंध, सूरमा, सुदर्शन, सगुणा, रोमा, कोईम्बतूर, कृष्णा, आर. H 9/90, RH- 13/90, पालम लालिमा, NDR 18, BSR 1, पंत इत्यादी हळदीच्या सुधारित जाती आहेत.
हळद लागवडीसाठी (Halad Lagwad) चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची निवड महत्त्वाची ठरते. या सर्व जाती 200 ते 250 दिवसांत तयार होतात.
लागवड पद्धती (Halad Lagwad)
१) सरी वरंबा पद्धत: हळद पिकास पाट पाणी पद्धतीने सिंचन करावयाचे असल्यास ही पद्धती फायदेशीर ठरते.
२) रुंद वरंबा पद्धत: ठिबक सिंचन पद्धती उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. रुंद वरंबा पद्धतीने हळद लागवड केल्यास वरब्यांवर पडणाऱ्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. परिणामी कंदकूज रोगापासून हळद पिकाचे संरक्षण होते.
बेणे निवड
एक हेक्टर लागवडीसाठी 25 क्विंटल जेठे गड्डे (त्रिकोणाकृती मातृकंद) बियाणे आवश्यक असते. साधारण 50 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सशक्त, रसरशीत तसेच नुकतीच सुप्तावस्था संपवून थोडेसे कोंब आलेले असावेत. गड्डे स्वच्छ करून त्यावरील मुळ्या काढून घ्याव्यात. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये.
जेठे गड्डे उपलब्ध होत नसतील तर बगल गड्डे (40-50 ग्रॅम) किंवा हळकुंडे (30 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे) बेणे म्हणून वापरावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराचे भेसळमुक्त असावेत.
बेणे प्रक्रिया (Turmeric Seed Treatment)
रासायनिक बेणे प्रक्रिया: क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 2 मिलि अधिक कार्बेन्डाझिम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात निवडलेले गड्डे 15 ते 20 मिनिटे बुडवावेत. नंतर बेणे सावलीत सुकवावे.
जैविक बेणे प्रक्रिया: ॲझोस्पिरीलम 10 ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक (पीएसबी) 10 ग्रॅम आणि व्हॅम 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात बेणे 10 ते 15 मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे.
अगोदर रासायनिक बेणे प्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवावे. त्यानंतर लागवडीपूर्वी जैविक बीजप्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन (Turmeric Fertilizer Dose)
सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केल्यास उत्पादनवाढीस फायदा होतो. पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी 35 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
माती परीक्षणानुसार हेक्टरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावा. नत्र 2 हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी, तर दुसरा हप्ता भरणीच्या वेळी (लागवडीनंतर 105 दिवसांनी) द्यावा. तसेच भरणीच्या वेळी हेक्टरी दोन टन निंबोळी किंवा करंज पेंडीचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापन
- रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबकच्या दोन लॅटरलमधील अंतर 4 ते 5 फूट ठेवावे
- जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
- लागवड एप्रिल-मे महिन्यात होत असल्याने सुरवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. कारण मुळांना जमिनीत स्थिरता प्राप्त होण्याचा हा काळ असतो. या कालावधीत आंबवणीचे पाणी 4 ते 6 दिवसांच्या अंतराने द्यावे. जमिनीप्रमाणे हा कालावधी कमी-जास्त ठेवावा.
- पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यांनंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर 12 ते 15 दिवस ठेवावे. मात्र पीक काढणीच्या 15 दिवस अगोदर अजिबात पाणी देऊ नये.
- पाऊस समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम प्रतिच्या जमिनीत पाण्याच्या 13 ते 15 पाळ्या द्याव्या लागतात.
आंतरपिकांची निवड आणि लागवड (Turmeric Intercropping)
- हळदीची मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळे जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
- तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. 25 टक्के सावलीमध्ये हळद पीक चांगले वाढते.
- आंतरपिके ही हळद पिकापेक्षा उंचीने कमी तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत.
- हळद लागवड केल्यापासून 3 ते 3.5 महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. हळकुंडे येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणे फायदेशीर ठरते.
- आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड करावी.
- हळदीमध्ये आंतरपीक म्हणून मका पिकाची लागवड टाळावी. कारण, मका पिकामुळे हळदीच्या उत्पादनात 15 ते 20 टक्के घट येते.