हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना (Pipeline Subsidy) राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. यात प्रामुख्याने विहीर खोदण्यासाठी, शेततळे खोदण्यासाठी देखील अनुदान दिले जाते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप करिता देखील अनुदान मिळते. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत (Pipeline Subsidy) सविस्तर जाणून घेणार आहोत.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून, लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. परिणामी, सध्या अनेक शेतकऱ्यांची पाईपलाईन (Pipeline Subsidy) करण्यासाठी लगबग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी दरवर्षी पाईपलाईनचे कामे करतात. उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांचे शेते रिकामी असतात. यामुळे उन्हाळ्यात प्रामुख्याने पाईपलाईनची कामे केली जातात. विशेष म्हणजे या पाईपलाईन साठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईपवर सरकारकडून अनुदान दिले जात आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून एक विशेष योजना राबवली जात आहे.
काय आहे ‘ही’ योजना? (Pipeline Subsidy For Farmers)
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पाईपलाईनसाठी आवश्यक असलेल्या पीव्हीसी पाईपवर अनुदान दिले जाते. पीव्हीसी पाईपसाठी अनुदान मिळवणे हेतू पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपसाठी अनुदान मिळते.
किती मिळते अनुदान?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 438 मीटर लांबीचे पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. म्हणजेच जवळपास 70 पाईप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत कमाल 30 हजार रुपयांचे अनुदान मिळू शकते. शेतकऱ्यांना यापेक्षा जास्तीचे अनुदान मिळत नाही. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू झाली असून, याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पीव्हीसी पाईप खरेदीसाठी अनुदान मिळते.
कोणाला मिळतो योजनेचा लाभ?
याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असते. त्यांना याचा लाभ मिळतो. किमान वीस गुंठे आणि कमाल सहा हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्षे याच योजनेचा लाभ मिळत नाही. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपसाठी अनुदान मिळवायचे असेल तर त्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. अर्ज सादर झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होते आणि मग पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती नंतर शेतकऱ्यांना पाईप खरेदी करावी लागतात. यानंतर आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि मग अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.