हॅलो कृषी ऑनलाईन : नदीजोड प्रकल्प (River Linking Project) केंद्रासह राज्य सरकारची अवाढव्य अशी प्रस्तावित योजना आहे. जास्त पाणी असलेल्या नदीखोऱ्यातील पाणी कमी पाणी असलेल्या नदीखोऱ्याकडे वळवणे, हा त्यामागचा उद्देश. हे करण्यासाठी अनेक धरणे, बंधारे अशा प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र आता याच नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाचे भाग्य उजळणार आहे. या भागामध्ये पाणी आणण्यासाठी तब्बल १३ हजार २५० कोटींचा नदीजोड प्रकल्प (River Linking Project) प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कशी आहे ही नदीजोड योजना? (River Linking Project)
हा नदीजोड प्रकल्प (River Linking Project) नाशिकच्या पश्चिम वाहिनी नद्यांतून मराठवाड्याला पाणी पुरवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यातून दमणगंगा आणि वैतरणा खोऱ्यातील पाणी वैतरणा धरणात सोडून, तेथून कडवा धरणाद्वारे दारणा आणि बोरखिंड धरणात पाणी सोडले जाईल. बोरखिंड धरणातून हे पाणी देवनदी आणि पूरकालवे मार्गे तालुक्यातील विविध भागात सोडले जाईल. या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यातील शेती आणि घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध होईल. याशिवाय शिल्लक पाणी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी पुरवले जाणार असल्याचे या योजनेबाबत बोलले जात आहे.
काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
हा नदीजोड प्रकल्प सर्वात उंच भागातून पाणी वितरित करेल. गोंदे आणि सुळेवाडी या दोन गावांच्या परिसरात सर्वाधिक उंचावरून बोगदा करून पाणी पुरवले जाईल. पूर्व भागातील वितरण व्यवस्थेसाठी देशवंडी, नायगाव, जायगाव, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री, निमगाव सिन्नर, हिवरगाव, कोमलवाडी, वडांगळी आणि गुळवंचमार्गे खोपडी आणि देवपूर मार्गे वितरण व्यवस्था करण्यात आली आहे. गोंदेहून वारेगाव-सायाळे पर्यंत पाणी पुरवले जाईल.
उन्हाळ्यातही कडवाला आवर्तन येईल आणि कडवाचे ३ ते ४ आवर्तने होतील.
काय आहे प्रकल्पाची सध्यस्थिती
हा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीला सादर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर साधारण दोन महिन्यांच्या आत या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सिन्नर तालुक्यातील दुष्काळ दूर होण्यास मदत होणार आहे. शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होईल. सिन्नर तालुक्यासाठी तयार करण्यात आलेला हा नदीजोड प्रकल्प हा एक महत्वाचा आणि दूरगामी उपक्रम ठरणार आहे.