Dashparni Ark: बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक ‘दशपर्णी अर्क’, तयार करण्याची पद्धती आणि वापर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप पिकांची पेरणी/ लागवड झालेली आहे. सुरुवातीच्या (Dashparni Ark) काळात पिकांवर रसशोषक किडी (Sucking Pests) आणि काही अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यावेळी सेंद्रिय कीटकनाशकाचा (Organic Pesticide) वापर करून या किडींचे योग्य व्यवस्थापन (Pest Management) करता येते. यामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होत नाही.  सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दशपर्णी अर्क होय. दशपर्णी अर्क (Dashparni Ark) हा अत्यंत बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे. 

नावाप्रमाणेच या अर्कात 10 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या उग्र वासाच्या वनस्पतीचा पाला यात वापरला जातो. दशपर्णी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक (Natural Pesticide) असून हे शेतकर्‍यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होवू शकतो.

दशपर्णी अर्कासाठी वनस्पतीचा वापर (Dashparni Ark Leaves)

  • कडुनिंब पाला 5 किलो
  • एरंडपाला 2 किलो
  • गुळवेलपाला 2 किलो
  • घाणेरीपाला 2 किलो
  • पपईचा पाला 2 किलो
  • सिताफळाचा पाला 2 किलो
  • रूईचा पाला 2 किलो
  • पांढरा धोतरा 2 किलो
  • करंजपाला 2 किलो
  • लाल कन्हेरपाला 2 किलो
  • झेंडू पाने, निरगुडी, बेशरम, पेरू इत्यादी 2 किलो.

इतर साहित्य (Dashparni Ark Content)

प्लास्टीक टाकी 200 लिटर, देशी गायीचे शेण 3 किलो, देशी गायीचे गोमूत्र 5 लिटर, हिरवी मिरची ठेचा 2 किलो, लसुण ठेचा पाव किलो, वरीलपैकी कोणत्याही 10 वनस्पतीचा पाला घ्यावा. एखाद दुसरी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो. शक्यतो देशी गायीचे शेण ताजे घ्यावे, सुकलेले वापरू नये. गोमूत्र जितके जुने तेवढा त्याचा औषधी गुणधर्म जास्त असतो.

दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत (Dashparni Ark Preparation)

  • यापैकी करंज, रूई, सिताफळाचा पाला, कडुनिंबाचा पाला, महत्त्वाचा बाकीचे सर्व उपलब्ध असतील त्यानुसार घेणे सर्व मिळून 10 वनस्पती होणे गरजेचे आहे.
  • वरील सर्व वनस्पती बारीक करून घेणे तसेच तिखट हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण ठेचा, देशी गायीचे शेण व गोमूत्र हे सर्व मिश्रण 200 लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये सडविण्यासाठी सावलीत ठेवून ते गोणपाटाने झाकून ठेवावे.
  • दिवसातून कमीत कमी 2 वेळा हे मिश्रण काठीने ढवळावे व पुन्हा गोणपाटाने झाकून ठेवून असे मिश्रण 1 महिनाभर ठेवल्यानंतर त्याला उग्र वास येतो त्यानंतर हे मिश्रण सुती कापडाने गाळून घ्यावे.
  • दशपर्णी अर्क (Dashparni Ark) तयार करताना तो सावलीच्या जागी करावा. दशपर्णी अर्क तयार झाल्यानंतर वस्त्रगाळ करण्यासाठी सुती कापडाचा वापर करावा.

दशपर्णी अर्काचा वापर (Dashparni Ark Uses)

दशपर्णी अर्क तयार केल्यापासून 3 महिन्याच्या आत वापरता येते. मात्र अर्क बंद झाकणाच्या कॅनमध्ये व्यवस्थित ठेवलेला असावा. दशपर्णी हा तयार झालेला अर्क कीड नियंत्रणासाठी 16 लिटर पाण्यात 200 मिली दशपर्णी अर्क फवारणीसाठी वापर करावा. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी.

दशपर्णी अर्काचे फायदे (Dashparni Ark Benefits)

  • दशपर्णी अर्काच्या फवारणीमुळे मित्र किडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होते.
  • उग्र वासामुळे किडी पिकांमध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होतात.
  • रासायनिक किटकनाशकाचा वापर कमी झाल्याने पिकांवर किडनाशकांचे अंश राहत नाहीत.
  • अर्क फवारणीमुळे लहान अळ्या, रसशोषक किडी व किडींची अंडी अवस्थेचे निर्मूलन होते.
  • पर्यावरणपूरक कीड नियंत्रण झाल्याने सकस व विषमुक्त भाजीपाला उत्पादित होतो व शेती मालास सेंद्रिय म्हणून उत्तम दरही मिळतो.

दशपर्णी अर्क (Dashparni Ark) तुडतुडे, मावा, फुलकिडे, पहिल्या 2 अवस्थेतील अळ्या यांच्यावर प्रभावी काम करते याची फवारणी शक्यतो दर 8 दिवसाला करावी.