Onion Export : बांगलादेश बॉर्डरवर कांदा निर्यात सुरू; कांद्यास मिळाला इतका दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : कांद्यावरील किमान निर्यात (Onion Export) किमतीचे निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याच्या प्रति टनास 550 प्रति डॉलर इतर भाव मिळणार असेल तरच कांदा निर्यातीची परवानगी मिळत असे, परंतु आता केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्याची अट रद्द केली आहे. तसेच कांद्यावरील 40 टक्के असणारे निर्यात शुल्क घटवून 20 टक्के इतके केले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कांदा व्यापाऱ्यांनी स्वागत केले. मात्र केंद्र सरकारने घेतलेले हे निर्णय सिस्टम अपडेट न झाल्याने काल बांग्लादेश बॉर्डवर 100 ट्रक तर मुंबई पोर्टवर 300 कंटेनर अडकून पडले होते.

कांद्याच्या निर्यातीसंदर्भातील हे निर्णय सिस्टिममध्ये अपडेट झाले नव्हते. त्यामुळे कांद्याची निर्यात (Onion Export) बंद होती. सिस्टिममध्ये हे निर्णय अपडेट झाल्यानंतर काल दुपारपासून कांदा निर्यात सुरू करण्यात आली. घोजाडांगा बॉर्डरवरून 29 ट्रक कांद्याची तर हिली बॉर्डरवरून 10 ट्रक कांद्याची निर्यात काल बांगलादेशला करण्यात आली. भारतामधून घोजाडांगा व हिली या दोन्ही ठिकाणाहून एकूण 39 कांदागाड्यांची निर्यात झाली.

निर्यातीच्या कांद्यास किती दर मिळाला?

नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बॉर्डरवर 61 ते 64 रु. प्रतिकिलो दर मिळाला तर दक्षिणेकडील कांद्याची 62 ते 64 रु. प्रतिकिलो दराने बॉर्डरवर विक्री झाली. मध्य प्रदेशातील कांद्याला 58 ते 61 रु. प्रतिकिलो इतका दर बॉर्डरवर मिळाला.

परदेशात कांद्याची मागणी वाढली

कांदा निर्यात शुल्कात 40 टक्क्यावरून 20 टक्के इतकी कपात केल्याने कांदा निर्यात वाढू लागली आहे. भारतीय कांद्यास बांगलादेश, श्रीलंका, आखाती देश, मलेशिया या देशांमध्ये मागणी होत आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.