हॅलो कृषी ऑनलाईन : बाजार समितीत शेतीमालाच्या लिलावानंतर 24 तासाच्या आत रोख स्वरूपात शेतीमालाची रक्कम अदा करणे हा नियम आहे. मात्र येवला तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याला याच नियमाला धरून चालण्याची मोठी किंमत चुकती करावी लागण्याची घटना घडली आहे. ममदापूर येथील कांदा उत्पादक तरुण शेतकरी अक्षय गुडघे या शेतकऱ्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्या ट्रॅक्टर मधून 20-22 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. अंदाजे 35 ते 40 हजार रुपये इतके कांदा विक्री नंतर पैसे मिळणार असल्याने शेती उपयोगी अवजारे घेण्यासाठी या रक्कमेचा वापर करण्याचा अक्षयचा मानस होता. या रकमेची अत्यंत गरज आहे त्यामुळे रोख स्वरूपात ही रक्कम आजच मिळावी , अशी मागणी अक्षय गुडघे यानं केली. शेतकऱ्याच्या या मागणीमुळे रागावलेल्या कांदा व्यापारी व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण सुरू केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, व्यापाऱ्यांनी मारहाण सुरु केल्यानंतर व्यापारी आणि कर्मचाऱ्यांच्या तावडीतून अक्षय गुडघे जीव वाचवत पळत येवला एसटी बस स्टँड समोर आला. यानंतर त्यानं शेतकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती समजताच नगर-मनमाड राज्यमार्गावर इतर शेतकऱ्यांच्या मदतीने या व्यापाऱ्यांच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू केले.अचानक सुरू झालेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने येवला शहर पोलिसांची धावपळ झाली. शेतकऱ्यांनी या मुजोर कांदा व्यापार्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी योग्य चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितल्यानंतर अर्धा तासाहून अधिक वेळ सुरु असलेला रस्ता रोको मागे घेण्यात आला.