मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता…! भूजल पातळीत वाढ, रब्बीला मोठा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी मराठवाडा म्हंटलं की दुष्काळग्रस्त भाग एवढाच डोळ्यासमोर यायचं… मात्र मागील ३-४ वर्षांपासून मराठवाड्यावर वरुणराजा चांगलाच बारसतोय यंदाच्या वर्षी तर मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. याचा फटका खरिपाला जरी बसला असला तरी मराठवाड्यासाठी रब्बीची चिंता मिटली आहे. कारण मराठवाडयाच्या भूजल पातळीमध्ये वाढ झाली आहे. रब्बीच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. मराठवाड्याच्या पाणीपातळी मध्ये २. ७९ मीटरने वाढ झाली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक भूजल पातळी ही लातूर जिल्ह्यात वाढलेली आहे. तब्बल 4.37 मीटरने पाणीपातळी वाढली आहे तर सर्वात कमी हिंगोलीची 1.16 मीटरने वाढली आहे. त्यामुळे खरिपासाठी नुकसानीचा ठरलेला पाऊस आता रब्बी हंगामातील पिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.मराठवाड्यात पावसाविना पिके वाया जातात असेच दरवर्षीचे चित्र असते. यंदा मात्र, परस्थिती बदलली असून अधिकच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. मराठवाड्यात पावसाची सरासरी ही 679.5 मिमी असते. यावेळी मात्र, 1112.4 मिमी पाऊस मराठवाड्यात बरसलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात 2.3 मीटरवर असलेली पाणीपातळी ही थेट 4.37 वर गेलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलेलाच आहे पण प्रकल्पातील शेतीसाठी असलेले राखीव पाणी यंदा देण्याचा निर्णय झाला आहे.

रब्बीला फायदा
पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी मराठवाड्यातील प्रकल्प हे यंदा तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा शेतीसाठी राखीव ठेवण्यात आलेले पाणीही दिले जाणार आहे. पाणीसाठा तर मुबलक आहे. हवामान पोषक राहिले तर रब्बी हंगाम जोमात येणार आहे. यंदा उशीराने रब्बीच्या पेरण्या होत आहेत. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. शिवाय पाणीसाठा असल्याने उत्पादनातही वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

संदर्भ : टीव्ही -९