हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे यासाठी अनेक बँका शेतकऱ्यांसाठी आकर्षक योजना राबवत आहेत. या योजनांमध्ये बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर योजना नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी नवीन घर बांधण्यासाठी आणि जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या लेखात बँक ऑफ इंडियाच्या स्टार किसान घर योजनेची माहिती जाणून घेऊया…
योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घर बांधण्यापासून घरांच्या दुरुस्तीपर्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळू शकणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांचे घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी सहज कर्ज घेऊ शकतात.या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत शेतकऱ्यांना आयटी रिटर्न (इन्कम टॅक्स रिटर्न) देण्याची गरज भासणार नाही.
पत्रता
–या योजनेचा लाभ फक्त तेच शेतकरी घेऊ शकतात, ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे.
–ज्या शेतकऱ्यांना शेतजमिनीवर फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे, फक्त तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
— बँक ऑफ इंडियामध्ये KCC खाते असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
–या योजनेचा लाभ फक्त कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल. आणखी कोणीही नाही.
किती मिळते कर्ज
–स्टार किसान घर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जात आहे.
–शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर नवीन फार्म हाऊस किंवा घर बांधण्यासाठी बँकेकडून 1 लाख ते 50 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.
–याशिवाय सध्याच्या घरामध्ये दुरुस्ती किंवा नवीन घर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते .
कर्जावरील व्याजाची रक्कम
योजनेंतर्गत कर्ज घेतल्यावर शेतकऱ्यांना 1 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 8.05 टक्के व्याजदराने दिले जाईल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी 15 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जाईल. त्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड सहज करू शकतील.
कुठे कराल संपर्क
स्टार किसान घर कर्ज योजनेबाबत अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांक १८०० १०३ १९०६ वर देखील संपर्क साधू शकता.