हॅलो कृषी ऑनलाईन : एकरी 45 हजार रुपये खर्च करूनही अपेक्षित दर व उत्पादन न आल्याने पापरी ता मोहोळ येथील एका शेतकऱ्याने तीन एकरावर लागवड केलेल्या फ्लावर पिकावर थेट रोटर फिरविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालिका अध्यापही सुरू असल्याचे अधोरेखित होत आहे.हिरालाल विठोबा टेकळे या शेतकऱ्याने उसापेक्षा इतर पिकात जादा पैसे मिळतात. पाण्याचीही बचत होते म्हणून त्यांनी तीन एकर क्षेत्रावर फ्लावर या पिकाची लागवड केली.
जमिनीच्या मशागती पासून रोपे, लागवड, फवारणी, खुरपणी यासाठी त्यांचा एकरी सुमारे 45 हजार रुपये खर्च झाला. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याची व्यवस्था केली. सध्या पापरी आणि परिसरातील शेतकरी उसासारख्या पिकाला 18 ते 19 महीने सांभाळावे लागते तो ही गाळपास जाताना साखर कारखान्याचे उंबरे झिजवावे लागतात त्यासाठी कमी पाण्यात, कमी वेळात व कमी खर्चात येणारी पिके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हिरालाल टेकळे यांचे फ्लॉवर पीक काढणी योग्य झाल्यानंतर त्याने ते काढून सोलापूर -पुणे या भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविले.
पुण्याच्या भाजीपाला मार्केटमध्ये फ्लावर तीन ते चार रुपये किलो प्रमाणे विक्री केली, तर सोलापूर भाजी मार्केटमध्ये चार ते पाच रुपये नगाप्रमाणे विक्री झाली. विक्रीची पट्टी आल्यावर त्यांनी झालेला खर्च व उत्पादन याचा हिशोब केला असता हे पीक न परवडणारे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच भविष्यात ही दर वाढतील अशी शक्यता नसल्याने त्यांनी सारासार विचार करून फ्लावर पिकावर थेट रोटर फिरवून त्याचा खत तयार केला. या सर्व प्रक्रियेमुळे टेकळे यांचा केलेला खर्च पूर्ण वाया गेला. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.
फायदा व्यापाऱ्यांनाच शेतकऱ्यांना मात्र ठेंगाच …
मात्र रिटेल मार्केटमध्ये फ्लॉवरचा भाव पहिला तर ग्राहकांना पुण्यात फ्लॉवर २० रुपये पाव किलो या दराने मिळतो आहे. शिवाय व्यापारी उन्हाळा असल्यामुळे दर वाढलेत अशी सबबही ग्राहकांना देतात. असे असताना सर्व फायदा व्यापारांचाच होताना दिसत आहे. जो शेतकरी काबाडकष्ट करून पीक घेतो त्याला मात्र आपला माल कवडीमोल दराने विकावा लागतो. भरमसाठ खर्च करूनही हातात केलेला खर्चही पडत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागून गेल्याचे चित्र आहे.