हॅलो कृषी ऑनलाईन : छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Agri Minister) या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पार्टीच्या 10 खासदारांसह 3 केंद्रीय मंत्र्यांनी आज (ता.6) आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये केंद्रीय कृषीमंत्री (Agri Minister) नरेंद्र सिंह तोमर यांचाही समावेश असून, त्यांनी आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांचे केंद्रीय कृषिमंत्रीपद संपुष्टात येणार असून, त्यांना मध्यप्रदेशात जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता देशाच्या नवीन कृषिमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे असेल या चर्चांना उधाण आले आहे.
अलीकडेच झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत नरेंद्र सिंह तोमर (Agri Minister) यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाने विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यानुसार दिमनी मतदारसंघातून त्यांनी मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती. मध्यप्रदेश विधानसभेच्या हाती आलेल्या निकालानुसार त्यांनी २४ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना मध्यप्रदेश राज्याच्या राजकारणात सक्रिय जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आता त्यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद किंवा विधानसभा अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री कोण होणार? (Agri Minister Narendra Singh Tomar Resigns)
दरम्यान, आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने देशाच्या कृषीमंत्रिपदाची धुरा नव्याने कोणाकडे दिली जाईल. याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चा सुरु असून, त्यामध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कैप्टन अमरिंदर सिंह यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.