हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या पणन खात्याने गुरुवारी सायंकाळी काढला आहे. आज प्रशासक पदाचा कार्यभार घेणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील इतर सहा बाजार समित्यांवर संबंधित तालुक्यांतील सह निबंधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांवर शुक्रवारपासून प्रशासकराज राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
सांगली बाजार समितीसह जिल्ह्यातील तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर शिराळा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांवर प्रशासकांची नेमणूक होणार आहे. तसा आदेश शासनाच्या पणन विभागाने दोन दिवसापूर्वीच काढला होता. मात्र कोणत्या बाजार समितीवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होणार हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. याबाबत गुरुवारी सायंकाळी लेखी आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित सहा बाजार समित्यांवर सहाय्यक निबंधक आणि सह निबंधक वर्ग एक या अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.