हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, बाजार समित्यांमध्ये शेतकरी अगदी विश्वासाने आपला शेतमाल विक्रीसाठी आणतो. मात्र बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरवातीला शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून नंतर फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली मार्केट यार्डात हळद व्यापाऱ्यांकडून शेतकऱयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे व्यवहार करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे १२ लाख अडकले
मार्केट यार्डातील हळद व्यापाऱ्याने बावची येथील दहा शेतकऱ्यांना सुमारे बारा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. एस. बी. पाटील या व्यापाऱ्याने बाजारभावापेक्षा एक हजार रुपये जादा देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांचा विश्र्वास संपादित केला. मात्र, हळद घेऊन शेतकऱ्यांना चुना लावला आहे. काही शेतकऱ्यांना थोडी उचल दिली आहे, काहींना धनादेश दिला, मात्र तो वटलेला नसल्याचे स्पष्ट झाले. दहा शेतकऱ्यांचे सुमारे बारा लाख रुपये अडकले आहेत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांस फोन लावला तरी तो उचलला जात नाही. त्यामळे शेतकरी हतबल झाले असून थेट बाजार समितीमध्ये येवून व्यापाऱ्याविरोधात तक्रार केली आहे. प्रारंभी हळदीचे संपूर्ण पेमेंट करण्यात आले.
त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा संबंधित व्यापाऱ्यावर विश्वास बसला. बाजारापेक्षा जादा दराने हळदीला दर मिळत असल्याने त्या व्यापाऱ्यास हळद देण्याचा निर्णय घेतला. थेट शेतात जावून हळद पाहून दर निश्चित केला. तेथील सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांनी पाटील यांना हळद विक्री केली आहे. ठरलेल्या वायद्याप्रमाणे संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे बिल दिले नाही. दिलेले चेक बाउन्स झाले असून त्यानंतर वेळकाढूपणा करीत पुढील वायदे देऊन फसवणूक केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.