स्तुत्य उपक्रम ! कृषी विभागाच्या गटशेती योजनांची तांत्रिक माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :गजानन घुंबरे ,परभणी प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती व जोडधंदा विषयी शेताच्या बांधावर जात तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत असून यामध्ये कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध गट शेतीच्या योजना यासंदर्भात प्रकल्प आत्माच्या वतीने हे कार्यक्रम घेतले जात आहेत .परभणी जिल्ह्यातील बोरगव्हाण येथे शुक्रवारी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले .

बोरगव्हाण येथे शेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कृषी विभाग (आत्मा )व लताई शेतकरी उत्पादक कंपनी ( बोरगव्हाण ता.पाथरी )यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम उद्योग, तुती लागवड, प्रौढ कीटक संगोपन, बाजारपेठ तसेच कृषी विभाग गटशेती योजना याबद्दल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन शुक्रवार पाच फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले .पाथरी तालुका कृषी विभाग प्रकल्प आत्मा व स्थानिक शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगव्हाण येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रकल्प आत्माचे विशाल दलाल यांनी आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञान,पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण, गांडूळ खत, दोहेरी पीक अवलंब, यामध्ये कांदा, भुईमूग, हरभरा, द्यांच्या किंवा ताग या पिकांचा समवेश करून थेट शेतकरी ते ग्राहक विक्री करावी असे आवाहन केले .

तर प्रकल्प आत्माचे तंत्रज्ञ नितीन जाधवर यांनी मार्गदर्शन करताना शेतीला जोडधंदा रेशीम उद्योग तुती लागवड करून शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारता येईल.याचबरोबर शेळीपालन, कुकूटपालन, दुग्धव्यवसाय, शेंद्रीय शेती, कंपोस्ट खत, शेणखताचा वापर, जीवामृत, गांडूळ स्लरी, वेस्ट डी कंपोजर यांचा वापर करून रासायनिक खतावर होणारा खर्च कमी करता येईल.अशी माहिती दिली. यावेळी लताई स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष वैभव खुडे यांनी विकेल ते पिकेल योजनेचा अवलंब करून थेट शेतकरी ते ग्राहक लताई शेतकरी उत्पादक कंपनीने उत्पादीत केलेला शेतमाल विक्री करून चांगला नफा कमावला आहे अशी यशोगाथा सांगितली. या कार्यक्रमाला स्थानिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती .