हॅलो कृषी ऑनलाईन: वाढत जाणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप (Crop Loan) पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी (Banks) मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे. उसाला सर्वाधिक हेक्टरी एक लाख 32 हजार 700 रुपये इतके कर्ज बँका (Bank Loan) देणार आहेत.
लाख-दोन लाखांहून अधिक खरीप पेरणी सोलापूर जिल्ह्यात तरी अशक्य होती. कारण खरीप पेरणीचा (Kharif Sowing) कालावधी असताना जून-जुलै महिन्यांत पेरणी व पीक वाढीसाठी पुरेसा पाऊस पडत नसायचा. उशिराने पडणार्या पावसाच्या भरवशावर तूर, मका ही पिके अधिक क्षेत्रावर घेतली जात असायची. कारण सिंचनाची सुविधा व सिंचन क्षेत्र फारच कमी होते.
एखाद्या शेतकर्याने खरीप पेरले व पावसाने ओढ दिली तर पीक हमखास जायचे. मात्र अलीकडे विहिरी, बोअर, उजनी व लगतचे उतर तलाव, तसेच स्प्रिंकलरने पाणी देऊन पीक वाचवू शकते. शेतकर्यांना पीक वाचविण्यासाठी पर्यायी सुविधा झाल्याने तसेच जून-जुलै महिन्यांत पाऊसही हजेरी लावत असल्याने खरीप क्षेत्रात वाढ होत आहे.
याशिवाय पिकाला पावसाचा फटका बसलाच तर पीक विमा कंपनी (Crop Insurance Company) मदतीला येतेच. त्यामुळे वाढणारे खरीप क्षेत्र लक्षात घेऊन राज्य शासनाने कर्जविषयक धोरणात बदल केला आहे. खरीप हंगामातील पिकांना कर्ज वाटप व्याप्ती वाढवली आहे. शिवाय कर्ज रक्कमही (Crop Loan) दरवर्षी वाढविली जाते.
सोयाबीनसाठीही बँका देतात कर्ज
● पाच वर्षांखाली बार्शी, अक्कलकोट तालुक्यांत दाखल झालेले सोयाबीन आता खरीप हंगामातील प्रमुख पीक झाले आहे. मागील वर्षी सव्वा लाख हेक्टर पर्यंत सोयाबीन पेरले होते. त्यामुळे सोयाबीनसाठीही पीक कर्ज (Crop Loan) बँका देत आहेत.
● सोयाबीन बागायतसाठी मागील वर्षी हेक्टरी 49 हजार 500 रुपये पीक कर्ज देता येत होते. यावर्षी बागायत सोयाबीनसाठी रक्कम 13 हजार 100 रूपयांनी कमी करण्यात आली असून ती 36 हजार 400 रुपये करण्यात आली आहे. यंदा जिरायत सोयाबीनसाठी हेक्टरी 34 हजार 400 रुपये पीक कर्ज मिळणार आहे. आडसाली उसाला हेक्टरी एक लाख 32 हजार 700 रुपये व सुरू लागवडीसाठी हेक्टरी सव्वा लाख रुपये पीक कर्ज (Crop Loan) मिळणार आहे.
कोणत्या पिकाला किती कर्ज? (Crop Loan)
पीक | वर्ष 2023 | वर्ष 2024 |
ज्वारी | 27,500 | 28,600 |
बाजरी | 29,700 | 30,000 |
भुईमूग | 40,600 | 43,500 |
तूर | 44,000 | 45,000 |
सूर्यफूल | 35,000 | 35,400 |
कापूस | 55,000 | 55,500 |
सोयाबीन | 49,500 | 36,400 |
मका | 47,300 | 48,000 |
मिलेट्स | 35,000 | 35,000 |
(ही कर्ज रक्कम प्रति हेक्टरी व बागायती पिकांसाठी आहे. जिरायत पिकासाठी कर्जमर्यादा रक्कम प्रत्येक पिकांची यापेक्षा कमी आहे.)