जिल्हा बँकेने द्राक्ष, डाळिंब कर्जास मुदतवाढ द्यावी ; जयंत पाटील यांच्या संचालकांना सूचना

Grapes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीसारख्या संकटाला द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांना सातत्याने सामोरे जावे लागते. पावसाने झालेले नुकसान आणि पीक विमा कंपन्यांचे निकष यामध्ये मेळ लागत नसल्याने बागायतदार मदतीपासून वंचित राहतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेने द्राक्ष उत्पादकांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन त्यांना कर्जवसुलीत सवलत द्यावी. हप्ते पाडून कर्जवसुलीस मुदतवाढ द्यावी, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केल्या.

राज्य सरकार द्राक्ष उत्पादकांच्या कर्जाचे व्याज भरण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील आणि सहकार, कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत झाले. जयंत पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षापासून आकस्मिक संकटे व भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार अडचणीत आला आहे. अशावेळी त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी बँकेने पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिले पाहिजे.

बँकेने द्राक्ष उत्पादकांची अवस्था पाहूनच कर्जे वसूल करावीत. त्यांची बाग नैसर्गिक संकटामुळे वाया गेली आहे, त्यांना कर्जवसुलीत सवलत द्यावी. दोन वर्षांसाठी हप्ते पाडून द्यावेत. व्याजावर-व्याज आकारू नये. व्याजाचा काही भाग राज्य सरकार उचलण्यास तयार आहे.