पावसाळ्यात असे करा दुधाळ जनावरांचे संगोपन

Cattles
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळ्यामध्ये आर्द्रता तसेच जमिनीतील ओलसरपणा वाढायला लागतो. हे वातावरण वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूंच्या वाढीकरिता अनुकूल असून, त्यामुळे जनावरांच्या प्रजनन संस्थेमध्ये अनेक विपरीत परिणाम दिसून येतात. उदा. जनावरे वारंवार उलटणे, गाभण न राहणे, माज न दाखवणे. आजच्या लेखात पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घेऊया…

पावसाळ्यात गोठ्यामध्ये गोचीड, पिसवा, माश्‍या, डासांचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. यांच्या प्रादुर्भावामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. जनावरांच्या पोटामधील जंत वाढायला सुरुवात होते, त्यामुळे दुधाळ जनावरांना, वेळोवेळी जंतनाशक देणे आवश्यक असते. आठवड्यातून एकदा संपूर्ण गोठयामध्ये जंतुनाशकाची फवारणी करावी. गोठ्याच्या भिंती, टणक पृष्ठभाग आणि गव्हाणी जाळून घ्याव्यात. पावसाळ्यात लसीकरण करावे.

गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याची गळती असेल त्याची त्वरित दुरुस्ती करावी. गोठ्यामधील दुर्गंधीयुक्त वातावरण असू नये याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यातील पृष्ठभाग ओला असेल, तर जनावर घसरून पडण्याची शक्यता असते. याकरिता गोठ्यातील जमीन कोरडी ठेवावी. जनावरांच्या खुरांची नियमित तपासणी करावी.

आहार व्यवस्थापन :

चारा किंवा खाद्य साठवणूक स्वच्छ व हवेशीर ठिकाणी असावी. चारा साठवणूक असलेले ठिकाण ओले असेल तर पावसाळ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो. बुरशीयुक्त खाद्य जनावरास दिल्यास आजार होतात, दुग्ध उत्पादन कमी होते, विषबाधा होते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. हिरवा व वाळलेला चाऱ्याचे योग्य संतुलन करावे. जनावरांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. उदा. ५०० किलो वजनाच्या दुभत्या गाई, म्हशींसाठी २० ते २२ किलो हिरवा चारा, ५ ते ६ किलो कोरडा चारा आणि ६ ते ७ किलो पशुखाद्य (दुधाच्या प्रमाणात) द्यावे. पावसाळ्यात दुधाळ जनावरांमध्ये कासदाह दिसतो. हे टाळण्यासाठी दूध काढण्या अगोदर आणि नंतर, जंतुनाशक द्रावणांनी सड, कास स्वच्छ करावी. गाभण जनावरांना जास्त प्रमाणात हिरवा चारा दिल्याने मायांग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. यासाठी समतोल आहार देणे आवश्यक आहे. दुधाळ गाई, म्हशींना दूध उत्पादनाचा ताण असतो. सोबतच वातावरणाचा ताण पडला, तर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन प्रजनन प्रक्रिया आणि दूध उत्पादनावर वाईट परिणाम दिसून येतो. पावसाळ्यातील प्रजनन संस्थेविषयी आजार टाळण्यासाठी दुधाळ गाई, म्हशींची योग्य काळजी, गोठा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पाणी आणि समतोल आहार देणे हे अतिशय आवश्यक आहे.